डॉ. दत्ता देशकर
पाणी माझ्याशी बोलले. ते मला म्हणाले, ‘‘मित्रा, काय सांगू, माणसाला माझी आठवण फक्त मे आणि जून या महिन्यांतच येते. पाऊस झाला, की मला दहा महिन्यांसाठी तो विसरून जातो. किती कृतघ्न आहे हा मानव?’’
किती खरी होती पाण्याची तक्रार? याबाबत आपण काही विचार करणार आहोत किंवा नाही? मॉन्सून बेभरवशाचा झाला आहे, अशी आपण सर्वच जण तक्रार करीत असतो; पण कोणी केले त्याला बेभरवशाचे? जंगलांचे आपणच खच्चीकरण केले. शेतावर झाड सापडणे दुरापास्त झाले. नवनवीन कारखाने उघडून हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कोणी वाढवले? निसर्गाच्या विरुद्ध गेले तर काय होते, हे लक्षात आले ना? इतके करूनही आपली अपेक्षा काय, तर पावसाने मात्र त्याचा स्वभाव आहे तसा टिकवून ठेवावा. कमाल आहे बुवा आपली.
पाण्याचे योग्य प्रकारे व काळजीपूर्वक व्यवस्थापन केले, तर आपल्याला ४00 मि.मी. पाऊस पुरेसा आहे. महाराष्ट्रात अशी एकही जागा नाही, जिथे त्यापेक्षा कमी पाऊस पडतो. बहुतांश ठिकाणी तर त्याच्या दुप्पट पडतो. आपण त्याला योग्य पद्धतीने अडवत व जिरवत नाही, ही खरी अडचण आहे. पडणार्या पावसापैकी फक्त आपण १0 टक्के पाऊस अडवतो. खरी गरज आहे, ती म्हणजे आपण आपल्या स्वभावात बदल घडवून आणण्याची. तो बदल करणार नाही आणि विनाकारण पावसाच्या नावाने बोटे मोडत बसणार. हे कधीपर्यंत चालणार? आपण राज्यात लाखो बंधारे बांधले; पण आपले बंधारे बिचारे पाण्याशिवाय कोरडेच राहतात. एकूण काय, तर पाण्याचाही हिशेब नाही आणि पैशाचाही नाही. धरणांबद्दल कृपया बोलूच नका. पाणी अडविणे हा त्यांचा उद्देश थोडीच आहे? बहुतांश धरणे ही ‘इव्हॅपोरेशन टँक्स’ बनली आहेत. कारण आपण पाणी वितरणाची योग्य व्यवस्थाच केली नाही. ही धरणे बांधल्यावर पाणी वितरित करावे लागते, हे आपल्याला माहीत नव्हते का? मग कालवे कोण खोदणार? पाणी वितरण संस्था केव्हा स्थापणार? आज जागतिक बँकेने कान टोचल्यावर आपण या संस्था स्थापायला लागलो आहोत. मध्यंतरी मी औरंगाबाद शहराजवळील एका खेड्यात गेलो होतो. सर्वसाधारणपणे खेड्यात १0 पावले ओलांडली म्हणजे सांडपाण्याची नाली ओलांडण्यासाठी उडी मारावी लागते. मला एकही उडी मारावी लागली नाही, तेव्हा मला आश्चर्य वाटले. चौकशी केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. प्रत्येक घराजवळ एक शोषखड्डा खणण्यात आला होता. अंघोळीचे व इतर सांडपाणी त्या खड्डय़ात सोडले होते. त्यामुळे ते पाणी रस्त्यावर वाहत नव्हते. गावाची लोकसंख्या आपण २,000 पकडू या. दररोज खेड्यातली प्रत्येक व्यक्ती ७0 लिटर पाणी वापरते. यापैकी किमान ५0 लिटर पाणी त्या खड्डय़ात जात असावे. म्हणजे २,000 गुणिले ५0 लिटर बरोबर १ लाख लिटर पाणी दररोज त्या गावात जमिनीत सोडले जात होते. वर्षाचा हिशेब केल्यास ३.६५ कोटी लिटर पाणी ते गाव जमिनीत टाकत होते. हे पाणी जेव्हा जमिनीत जाते, तेव्हा ते वेगवेगळे थर पार करीत शुद्ध होत-होत भूजलाला जाऊन मिळते. शिवाय, सांडपाणी जमिनीत मुरले, तर गावात रोगराईचे प्रमाणही घटणार; पण आज कोणत्याही खेड्यात गेल्यास सिमेंटच्या नाल्या बांधून सांडपाणी गावाबाहेर काढलेले दिसून येते, असे असेल तर पाणी मुरणार कोठे व कसे? सांडपाणी व्यवस्थापन तर आपल्या खिजगणतीतसुद्धा नाही. आपण वापरलेले पाणी सांडपाण्याच्या स्वरूपात ७0 ते ८0 टक्क्यांपर्यंत आपल्याजवळ उपलब्ध असते. त्यावर योग्य ती प्रक्रिया केली, तर आपली पाण्याची गरज ७0 टक्क्यांनी कमी होऊ शकते. सिंगापूरमध्ये तर सांडपाणी १00 टक्के शुद्ध करून पिण्यासाठीसुद्धा वापरले जाते. आपण निदान ते शुद्ध करून शेतीच्या कामासाठी वापरायला काय हरकत आहे?
आता तर दुष्काळ तोंडावर येऊ घातला आहे. तहान लागली म्हणजे विहीर खणणारे आपण. काळ निष्ठूर आहे. तो कोणालाही माफ करीत नसतो. आता तोच फेरा सुरू होणार- माणसांच्या व जनावरांच्या छावण्या, टँकरद्वारे पाणीपुरवठा, त्यातील हिशेबाचे गैरव्यवहार, होणार्या नुकसानाचे मोजमाप, सुकलेले शेतकर्यांचे चेहरे, अपुर्या आर्थिक मदतीचा ओघ, त्यात पैशाचा अपहार, शहरांकडे वाढत जाणारे ग्रामस्थांचे लोंढे या सर्व गोष्टी ओघाने आल्याच. पाणी ही कारखान्यात तयार होणारी गोष्ट नाही. ती आपल्याच पद्धतीने उपलब्ध होणार. आज त्याचे नियोजन केले, तर त्याचा लाभ पुढील वर्षी होणार. पुढील वर्षी संकट येऊ नये, म्हणून आतापासून तयारी करायला हवी.
दुष्काळाची तीव्रता कमी होण्यासाठी खालील काही उपाय सुचवावेसे वाटतात :-
१) पाऊस येणार हे निश्चित. हा येणारा पाऊस जास्तीत जास्त प्रमाणात कसा अडविता येईल, या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे निदान रब्बी पीक तरी हातात येऊ शकेल. गाव तिथे गावतळी, शेत तिथे शेततळी, नाला तिथे बंधारे व विहीर तिथे पुनर्भरण या सूत्राचा वापर करून जलसाठे वाढवावेत.
२) जास्त पाणी वापरणारी पिके नियंत्रणाखाली आणावीत. त्यात काही जणांचा खेळ होतो; पण सर्वसाधारण शेतकरी मात्र वेठीला धरला जातो. ऊस ही काही जीवनावश्यक गोष्ट नव्हे. अन्नसुरक्षेत त्याला स्थान नाही. अन्न नसेल, तर माणूस जगू शकत नाही.
३) या वर्षीचा जरी नाही, तरी पुढील वर्षीचा खरीप हंगाम कसा सुरक्षित राहील, याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.
तर, जितक्या संस्था स्थापण्यात आल्या, त्यांपैकी फक्त ५ टक्के संस्था बर्या (कार्यक्षमपणे नव्हे) चालल्या आहेत. धरण केव्हा पूर्ण होईल, कालवे खणणे केव्हा सुरू करायचे, वितरण संस्था केव्हा स्थापन करायच्या म्हणजे शेतकर्याला आपण योग्य पद्धतीने पाणी देऊ शकू, हा क्रम कोण ठरवणार? आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर धरणे बांधण्याचा खटाटोप करायला तुम्हाला कोणी सांगितले होते? हे सर्व पाणी समुद्रात जाऊ दिले असते, तर निदान पर्यावरणवादी तरी खूष झाले असते. ५0-६0 वर्षांनंतर तुम्हाला वितरण संस्था स्थापण्याची आठवण व्हावी, यासारखे देशाचे दुर्दैव नाही, असे खेदाने म्हणावे लागते.
मला पाणी देण्यासाठी आपल्याजवळ फक्त एकच पीक आहे की काय, असा प्रश्न पडायला लागला आहे. आपण परदेशातून खायचे तेल आयात करतो, बहुतांश डाळी आयात करतो. त्या आपल्या देशात तयार होऊ शकत नाहीत काय? या आयातीवर आपण आपले दुर्मिळ परकीय चलन मोठय़ा प्रमाणात खर्च करतो; पण आपल्या देशात या गोष्टी चांगल्या प्रकारे तयार होऊ शकणार नाहीत काय, याचा विचार मात्र करीत नाही. कारण, सिंचनाचे पाणी त्यांच्या वाट्यालाच येत नाही. या पिकांना एक-दोन पाणी जरी मिळाले, तरी त्यांचे भरघोस उत्पादन होऊ शकते; पण, आपण सर्व ऊस या एकाच पिकाला कवटाळून बसलो आहोत. मृगजळ दिसले, तरी ऊस लावायला आपण कमी करणार नाही, असे वाटायला लागले आहे. एकूण उपलब्ध पाण्यापैकी जवळपास ८0 ते ९0 टक्के पाणी हे एकमेव पीकच खाऊन टाकत आहे. ऊस तयार करणारे शेतकरी, साखर कारखानदार, खासदार, आमदार, मंत्री, इतर सटरफटर राजकीय पुढारी यांचे एक विश्वच तयार झाले आहे. त्याचे सामान्यजनांशी काही नातेच शिल्लक उरले नाही. २0१२चा दुष्काळ पडण्यासाठी हे एकमेव पीकच जबाबदार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. धष्टपुष्ट माणसांनी आजारी साखर कारखाने पोसण्याचे जणू काय व्रतच घेतले आहे. आपले राज्य निव्वळ या साखर कारखान्यांवर उभे आहे. त्या कारखान्यांचा व सरकारचा एकदमच निकाल लागणार आहे की काय, न कळे. या वर्षी पावसाने चांगलीच दांडी मारली आहे. दर वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो, हे आता नव्याने सांगायची गरजच राहिलेली नाही. जून महिना कोरडा जातो, हे आता लहान मुलालासुद्धा कळायला लागले आहे. मग याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी आपण गेले वर्षभर काय उपाययोजना केली, हा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा? पावसाचे गणित अगदी सोपे आहे. आजकाल पाऊस वर्षातून जवळपास फक्त ३0 दिवस पडतो. दर दिवशी फक्त तीन ते चार तास पडतो. म्हणजे फक्त १२0 तास पडतो. १२0 तासांचे दिवस करायचे झाल्यास ते फक्त ५ होतात. म्हणजे पाच दिवस पडणारे पाणी आपल्याला ३९५ दिवस (३६५ दिवस अधिक ३0 दिवस उशिराचे) सांभाळून वापरायचे आहे. हे गणित तसे विपरीतच आहे; पण याच गणिताला आपल्याला उत्तर शोधून काढायचे आहे. नसता ‘अच्छे दिन’पासून कोसो दूर राहणार आहेत.
पाणीवापरात आपण काही बदल करू शकतो काय, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यासारख्या एका शहराचे आपण उदाहरण घेऊ या. ४0,00,000 लोकांनी जर रोज १0 लिटर पाणी वाचविण्याची शपथ घेतली तर काय होईल, याचा आपण विचार करू या. असे झाले तर वर्षभरात (४0,00,000 गुणिले १0 गुणिले ३६५) १,४६0 कोटी लिटर पाणी वाचू शकेल. एवढे वाचलेले पाणी २,00,000 लोकसंख्या असलेल्या एका शहराला वर्षभर पुरू शकेल. फक्त त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
४) बदलत्या हवामानाचा विचार करून या हवामानाला योग्य अशी पीक पद्धती कोणती राहील, याचे प्रशिक्षण शेतकर्याला देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या हवामानाला साजेशा वाणांचा अभ्यास करून ते ज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवायला हवे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दुष्काळावर मात करणे हा अल्पकालीन प्रश्न नसून, त्यासाठी दीर्घ काळात उपाययोजना करणे अगत्याचे आहे, असे वाटते.
(लेखक भारतीय जल संस्कृती
मंडळाचे अध्यक्ष आहेत.)