प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
फार पूर्वी आमच्याकडे सिंग नावाचे शीख अधिकारी चिखलद:याला विभागीय वनाधिकारी होते. त्यांच्याकडे विलीची लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह जीप होती. तिचा रजिस्ट्रेशन नंबर होता 1201. (जवळपास दहा वर्षांनी ही गाडी माङयाकडे आली, त्याबद्दल नंतर कधीतरी.) सिंगसाहेबांची भूक प्रचंड होती. असं म्हटलं जात होतं की, त्यांना नाश्त्याला अठरा अंडी लागत. त्यांची ताकदही तितकीच अचाट होती. त्यांच्या जीपचे टायर बदलण्यासाठी त्यांना जॅकची गरज भासत नसे. त्यांचा ड्रायव्हर गुलाब टायर बदलत असताना ते जीप उचलत. जॅकबिकची काही भानगडच नव्हती. गुलाबच्या पोतडीत त्याच्या डीएफओसाहेबांचे असे बरेच किस्से होते.
सिंगसाहेबांना अस्वलांबद्दल खासच आकस होता. सिंगसाहेबांच्या वाटेत अस्वल आलं तर ते ड्रायव्हरला अस्वलाचा पाठलाग करायला सांगत आणि शक्य झालंच तर अंगावर गाडी घालायला लावत. सिंगसाहेबांना ह्या एकाच जंगली श्वापदाबद्दल एवढा कमालीचा डूख असायचं कारण मी गुलाबला विचारलं. त्यावर गुलाबने त्यामागची घटना सांगितली. सिंगसाहेबांचे काही पाहुणो त्यांना भेटायला पंजाबहून आले होते. सिंगसाहेब त्यांच्या पाहुण्यांसोबत संध्याकाळचा फेरफटका मारत होते. सिंगसाहेबांच्या त्यांच्या स्वत:च्या धाडसाबद्दल काही गोष्टी रंगात आल्या होत्या. त्यांच्या घरापासून दोनएकशे मीटरवर वनउद्यानापर्यंत ते पोचले होते. अचानक मागून टणटणीच्या झुडुपातून एक अस्वल त्यांच्यावर धावून आलं. सहा फुटी ते धूड मागच्या पायावर उभं राहून सिंगसाहेबांच्या जवळ जाऊ लागलं. सिंगसाहेबांनी त्यांचे केस मोकळे सोडले, जोराची आरोळी ठोकली आणि त्या अस्वलावर त्यांनी प्रतिहल्ला केला. कदाचित अस्वलाला असली काही धाडसी प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. त्याने माघार घेऊन जंगलाकडे धाव घेतली.
मी आधी म्हटल्यानुसार अस्वल कोणत्याही चिथावणीशिवाय हल्ला करतो आणि काही क्षणातच तो दुर्दैवी जीव जन्माचा जायबंदी होतो. अस्वलाला तोंड देणं म्हणजे खायची गोष्ट नाही. अशा वेळी लढणं किंवा चक्क पळून जाणं हे दोनच पर्याय असतात. एका पाच फुटी किरकोळ कोरकूने एका छोटय़ा कु:हाडीने पाच अस्वलांशी (नर, मादी आणि तीन पिल्लं) दिलेला लढा मला माहीत आहे. मी त्याच्या देहावरच्या जखमांची वीरचिन्हं पाहिली आहेत. कुंड गावच्या ह्या कोरकूबद्दल माङया मनात अतिशय आदर आहे. आपल्या जागेवर ठामपणो उभं राहून लढा देण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणो आमचा खानसामा अजीझच्या प्रकरणासारखी यशस्वी पलायनाचीही बरीचशी उदाहरणो आहेत. पण पलायन आणि लढय़ाची संमिश्र उदाहरणं विरळच आहेत. त्यातलंच एक माङया धारणीतल्या दिवसातलं आहे.
एकोणीशे ऐंशीचा उन्हाळा सरत आला होता, पावसाळा तोंडाशी आला होता. जंगलात आढळणा:या कुलू (स्टरक्युलिया युरेन्स) किंवा धावडा (अनॉगायसिस लॅटिफओलिया) झाडापासून डिंक गोळा करण्याची ही योग्य वेळ होती. डिंक गोळा करण्यासाठी झाडाला कु:हाडीने खाच पाडली जाई आणि दोन-तीन दिवसांनी खाचेतून स्त्रवलेला डिंक गोळा केला जाई. काहीवेळा जास्त डिंक मिळवण्याच्या लोभापोटी झाडाला इतकं जखमी केलं जाई की ते बिचारं मृत्युपंथाला लागत असे. असं नुकसान टाळण्यासाठी आम्ही काही क्षेत्रत डिंक गोळा करण्यावर बंदी घातली होती. डिंक गोळा करण्यासाठी सकाळचे काही तास योग्य असत. तुम्ही जेवढं लवकर कामाला लागाल तेवढा तुम्हाला लाभ जास्त हा अलिखित नियम होता.
एकदा एका लोभी माणसानं भल्या पहाटे चार वाजताच बंदी घातलेल्या क्षेत्रत प्रवेश केला. तो नुसतंच बेकायदेशीर कृत्य करत होता असं नव्हतं, तर तो वन्य श्वापदाच्या हक्काच्या वेळी त्याच्या क्षेत्रत अतिक्रमण करत होता. परिणामस्वरूपी अंधारात तो ज्याला भला मोठा धोंडा समजला तो धोंडा मागच्या दोन पायावर उभा राहिल्यावर कळून चुकलं की प्रत्यक्षात अस्वलरूपी यमराजच उभा ठाकला आहे. हल्लेखोराचा आकार पाहून त्या ठेंगण्याशा कोरकूने पलायनाचा मार्ग स्वीकारला. त्याने झाडांतून, टणटणीच्या झुडुपांखालून पळायला सुरुवात केली आणि त्या पशूला गुंगारा दिला. पण हाय रे दुर्दैवा ! ह्या पळापळीत रात्रीचं जेवण आटोपून झाडाखाली विश्रंती घेणा:या बिबटय़ावर तो जाऊन धडकला. साहजिकच बिबटय़ाला हा व्यत्यय अजिबात खपला नाही. त्याने त्याच्या पद्धतीने त्याचा समाचार घ्यायचं ठरवलं. आता मात्र आमच्या डिंकचोराला जागेवर पाय रोवून लढा देण्याशिवाय काही पर्याय उरला नाही.
बिबटय़ाच्या पहिल्या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि छातीला बिबटय़ाच्या पंज्याचा प्रसाद मिळाला. पण तो लगेचच सावरला आणि त्यानं आपला डावा हात बिबटय़ाच्या तोंडात घातला. एकीकडे दुस:या हातातील कु:हाडीने त्या बिबटय़ाचं पोट फाडून कोथळा बाहेर काढला. थोडय़ाशा झटापटीनंतर दोन्ही लढवय्ये जखमी आणि रक्तस्त्रवामुळे बेहोश झाले. हा माणूस सकाळ संपता संपता घरी परतणं अपेक्षित होतं, तो दुपार झाली तरी न उगवल्याने त्याचे वडील, बायको आणि काही गावकरी मंडळी शोध घ्यायला निघाले. घटनास्थळी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. बिबट मृतपाय झाला होता. पण कोरकूच्या अंगात धुगधुगी होती.
एव्हाना मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. गावक:यांनी बिबटय़ाला आणि त्या कोरकूला एकाच बैलगाडीत घालून धारणीला नेलं. ते माङया घरी पोहचेपर्यंत रविवारची सकाळ उजाडली होती. रविवार बाजारचा दिवस असल्याने आजूबाजूच्या गावांतून मोठय़ा संख्येने आलेले गावकरी त्यांच्या भोवती गोळा झाले. आम्ही त्या जखमी माणसाला घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेलो. प्राथमिक उपचारानंतर तो कोरकू शुद्धीवर आल्यावर पुढील औषधोपचारासाठी आम्ही त्याची अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात रवानगी केली. एकाच वेळी पलायन आणि लढा देणा:या ह्या वीराची जीवनरेखा बळकट होती. काही आठवडय़ांच्या उपचारानंतर तो खडखडीत बरा झाला. एक अधिकारी म्हणून त्याच्या गुन्ह्याकडे माझी भ्रुकुटी वळली तरी त्याच्या धैर्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहवलं नाही.
ह्या प्रकरणात आणखी एका माणसाचं मला कौतुक वाटलं, ते म्हणजे आमच्या निरीक्षण कुटीच्या चौकीदार नामदेवचं. त्या जखमी माणसाला अमरावतीला पाठवल्यावर आमचं लक्ष वळलं ते बिबटय़ाकडे. मी पशुवैद्यकीय अधिका:याला माङया घरी बोलावून घेतलं. त्याने त्या मुसळधार पावसात बिबटय़ाची छोटीशी बायोप्सी शरीर सडायला लागलं होतं, त्यामुळे त्याच्या जवळपास जायला कोणी धजावत नव्हतं. संध्याकाळपर्यंत त्यात अळ्या पडायला लागल्या होत्या. त्या दुर्गंधीमुळे मला मळमळायला लागलं आणि मला उलटी झाली. अशा वेळी कातडं काढण्यासाठी आणि पुढचे सोपस्कार करण्यासाठी मला नामदेवचं नाव सुचवण्यात आलं. वळवाच्या पावसात मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या अथक परिश्रमानंतर बिबटय़ाचं कातडं काढून उरलेला सर्व भाग माङया घराशेजारच्या खड्डय़ात पुरण्यात आला. नामदेवने घेतलेले श्रम मी विसरू शकत नाही, मग भले काही लोकं त्याचं श्रेय त्याला लालूच म्हणून दिलेल्या मोहाच्या दारूला देत होते.
हा प्रसंग घडला तेव्हा माङयाकडे जीप नव्हती. माङया कामाची व्याप्ती आणि अशा अचानक उद्भवणा:या घटना पाहून काही दिवसांत मला 1201 क्रमांकाची जीप देण्यात आली. हो, हीच ती जीप, जी दहा वर्षांपूर्वी सिंगसाहेबांच्या दिमतीला होती. त्याचा पिकअप चांगला होता पण बॅटरीचं आता वय झालं होतं. त्यामुळे ती ढकलगाडी झाली होती. हॉर्नच्या गळ्यातून जेमतेम आवाज फुटत असे. मिणमिणत्या उजेडामुळे हेडलाईट्सही मिट्ट काळोखातच जाणवत असत. मेळघाटच्या खडतर रस्त्यावर प्रदीर्घ काळ दिलेल्या सेवेमुळे जीपची बरीचशी झीज झाली होती. जीपच्या पहिल्याच फेरीत आम्हाला जाणवलं की तिच्या वयाचा आम्हाला आदर करायला लागणार आहे.
पावसाळ्यास अद्याप सुरुवात झाली नव्हती. त्या संध्याकाळी माङो सोबती होते धारणीचे वनक्षेत्रपाल पुरोहित आणि जुम्मा ड्रायव्हर. पुरोहित उत्साही तरुण होते, त्यांना जीप शिकण्याचा फार उत्साह होता. जुम्मा मजबूत कसलेला गडी होता, पण अतिशय भ्याड होता. कदाचित परिस्थितीने त्याच्या आतली सगळी उमेद मारून टाकली असावी. गेली दहा वर्षं मी लहान वाहनं चालवत होतो आणि त्यात चांगलाच पारंगत झालो होतो. येताना मी जीप चालवत धारणीहून ढाकण्याला आलो होतो आणि ढाकणा-डोलार रस्त्यावरच्या सागाच्या रोपवनाची तपासणी केली होती. काळोख दाटू लागला होता म्हणून मी सुचवलं की
ढाकणा विश्रमगृहात जावं. पण पुरोहितांची अजून फिरण्याची इच्छा होती आणि त्या संध्याकाळी हुकलेले वन्यप्राणी पाहावेत असा त्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी माझी जागा घेऊन गाडी चालवायला घेतली. मी त्यांच्या शेजारी बसलो. जुम्मा मागच्या सीटवर होताच. ढाकणा-डोलार रस्ता सोडून थोडं दोनएक किलोमीटर डावीकडे जाऊन मोकळ्या मैदानावर जाऊन परतायचं असं ठरलं.
आम्ही अर्धाएक किलोमीटर आत गेलो होतो. पुरोहितांचा स्टिअरिंगवर हात साफ करण्याचा प्रयत्न चालू होता. प्रकाश झपाटय़ाने मंदावत चालला होता आणि जवळपास काळोख पडला होता. त्यामुळे पुरोहित पुढे झुकून हेडलाईट्सचा स्विच चाचपडत होते. ह्या प्रयत्नात रस्त्यावरच्या काळ्या ढिगा:याकडे त्याचं साफ दुर्लक्ष झालं होतं. तो ढिगारा म्हणजे एकांडा, सहा फुटी, सहासातशे किलोचा मस्तवाल नर गवा होता. पुरोहितांनी गाडी थांबवावी म्हणून मी आणि जुम्मा एकाच सुरात किंचाळलो.
नवशिक्या पुरोहितांनी ब्रेकवर कच्चकन पाय दाबला खरा. पण त्याचवेळी क्लच पॅडलवर पाय ठेवायचं त्यांना सुचलं नाही. त्यामुळे इंजिन धपकन बंद पडलं आणि आमची जीप गव्यापासून कशीबशी एक फुटावर जाऊन बंद पडली. सहसा अशावेळी नैसर्गिक वृत्तीने जंगली श्वापद पळून जातं, पण हा गवा काही जागचा हलला नाही. त्याच्या भव्य आकाराचा परिणाम म्हणा किंवा त्याच्या वृत्तीत ते नसावं.
आमची जीप धक्क्याशिवाय सुरू होणार नव्हती आणि तोंडातला गवताचा घास न चघळता गवा आमचा अंदाज घेत ढिम्म उभा होता. त्याचा सुरुवातीचा थोडासा आश्चर्याचा भाव आता असा काही नकारात्मक बनू पाहत होता की ते आठवून अजूनही माङया काळजाचं पाणी पाणी होतं. एकीकडे पुरोहित इग्निशेन कीशी झटापट करत होते, दुसरीकडे जुम्मा माङया कानाशी लागून एकांडय़ा गव्याने भरलेले ट्रक कसे उलटवले त्याचे किस्से सांगू पाहत होता. आमचा गवा जन्मभर लक्षात राहील असे विखारी कटाक्ष टाकत होता. ही कोंडी जवळपास दोन मिनिटं टिकली. सरतेशेवटी त्या गव्याने ह्यातून मार्ग काढला. त्यानं जणूकाही काहीच झालं नाही अशा रीतीने पुन्हा चरायला सुरुवात केली. पण त्याने बराच काळ रस्ता काही मोकळा केला नाही. तो तसूभरही हलला नव्हता. त्याचं मच मच चघळणं चालूच होतं. अधूनमधून आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचं ते भरदार मस्तक वर होत होतं.
मंदसा चंद्रप्रकाश केव्हा खाली उतरला हे आम्हाला कळलंच नाही. अखेरीस एकदाचं हळूहळू पण नाइलाजाने ते धूड जीपच्या समोरून माङया बाजूस आलं. जुम्माची बडबडीची दुसरी फैरी चालू झाली. दोन फुटावरील गवा आणि उघडय़ा जीपमधील माङयामध्ये काही अडथळा नव्हता. माङया लहानपणी माङया वडिलांसोबत नागपूर जिल्ह्यातल्या देवलापारपाशी शंभरएक गव्यांचा थवा आम्हाला आडवा झाला होता. पण तेव्हाही असा काही जबरदस्त ताण जाणवला नव्हता. त्यातच संगीतकार नौशाद यांच्या भावाचा अशाच एका एकांडय़ा गव्यामुळे झालेल्या मृत्यूचा तपशील डोळ्यापुढे सरकून गेला. त्यावेळी मजेशीर न वाटणारी घटनाही आठवली. माङया एका मित्रच्या लॅण्ड रोवरला गव्यानं धडक दिली होती आणि डोक्यावर जीपचा दरवाजा मिरवत नेला होता. पण त्या परिस्थितीत आम्ही भांबावून न जाता शांत राहिलो होतो आणि मूर्खासारखी काही कृती केली नाही. तो शाही प्राणी शांतपणो चरत चरत जीपच्या मागच्या बाजूस जाऊन अंधारात नाहीसा झाला. तरीपण अर्धा तास आम्ही त्याचा कानोसा घेत होतो. पानांच्या सळसळीवरून तो शंभर मीटर तरी दूर गेला असावा ह्याची खात्री झाली. त्यानंतरच दोन वीर जीपमधून खाली उतरले, जीपला धक्का मारून त्यात पटकन चढून बसले. मी चंद्रप्रकाशात जीप चालवत ढाकणा विश्रमगृहात पोचलो. धैर्य आणि खूप सारं सुदैवाचं फळ आम्हाला मिळालं.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com