शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चित्रयोगी

By admin | Updated: October 8, 2016 14:36 IST

कलाकाराचे वय वाढले की त्याच्या कलाकृतीला आणखी बहर येतो. वयाच्या नव्वदीतही कॅनव्हास आणि कुंचल्याच्या जादूने चित्रकलेला नव्या उंचीवर पोहोचवणारा असाच एक अवलिया चित्रकार म्हणजे लक्ष्मण पै.‘गोमंतक विभूषण’ या गोव्यातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- सदगुरू पाटीलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री लक्ष्मण पै. माणसाचे वय वाढले की तो थकतो. मात्र कलाकार वृद्ध झाला तरी त्याची कला थकत नाही. मनातील कलेची ऊर्मी थकत नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री लक्ष्मण पै यांना भेटल्यानंतर असाच जिवंत अनुभव आला. एम. एफ. हुसेन यांचा सहाध्यायी असलेला ९० वर्षांचा हा अवलिया चित्रकार आजदेखील नव्या पेंटिंगच्या कामात मग्न आहे. गेल्या पन्नास- साठ वर्षांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये पै यांच्या चित्रांची, पेंटिंग्जची प्रदर्शने भरली. अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. 

‘गोमंतक विभूषण’ हा गोव्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. गोवा सरकारने पै यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर केला. याआधी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आणि जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कुरैय्या यांनाच केवळ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रुपेरी वाळूचे समुद्रकिनारे लाभलेल्या आणि काही विशिष्ट तालुक्यांत लॅटीन संस्कृतीचा प्रभाव असलेल्या गोव्यात सेकंड होम घेणे जगभरातील व्यक्तींना आवडते. निवृत्तीनंतर जगातील अनेक महनीय व्यक्ती, उच्चभ्रू, उद्योगपती, कलाकार गोव्यात येऊन राहतात. शरद पवारांपासून राहुल द्रविडपर्यंत आणि बिपाशा बसू, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ यांच्यापासून विजय मल्ल्यांपर्यंत सगळ्यांनाच गोव्याचे भारी आकर्षण. काहीजणांचे गोव्यात फ्लॅट व बंगले आहेत, तर काहीजण नववर्ष साजरे करण्यासाठी दरवर्षी गोव्यातच येतात. लक्ष्मण पै हे दिग्गज कलाकार मूळ गोव्याचेच. त्यांनी जगभर भ्रमंती केली. त्यामुळे त्यांचे ९० टक्के आयुष्य गोव्याबाहेरच गेले. आता गेल्या आॅगस्टपासून ते गोव्यात येऊन स्थायिक झाले आहेत. पॅरीसमधील वास्तव्यावेळी तेथील कलाकृतींनी आपल्याला प्रेरणा दिली व आपल्या चित्रकलेस तिथेच बहर आला, असे लक्ष्मण पै आवर्जून सांगतात.राजधानी पणजीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील दोनापावला या अत्यंत उच्चभ्रू भागात लक्ष्मण पै राहतात. ते राहत असलेल्या बंगल्यामधून अरबी समुद्राचे विलोभनीय दर्शन घडते. लाल खनिज माल घेऊन जाणारी जहाजे आणि मच्छीमारी होड्यांची येथून कायम ये-जा सुरू असते. समुद्राची गाज ऐकणं आणि या जहाजांच्या हालचाली टिपणं हाच पै यांचा आज मुख्य विरंगुळा असला तरी एकदा का चित्र काढायला लागले की ते देहभान विसरतात.वयोमानामुळे दैनंदिन कामे करणेही पै यांना कठीण जाते. त्यासाठी चोवीस तास सहकाऱ्याची त्यांना गरज लागते, चालण्यासाठी आधार लागतो, पण हेच पै आपल्या आवडत्या चित्रविश्वात गुंतले की साऱ्या जगाचा त्यांना विसर पडतो. आपले वयही ते विसरतात आणि अखंडपणे काम करताना रंगरेषांत रममाण होतात. वय झालेले असले तरी पै यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख आहे. इतिहासाचा पट ते नेमकेपणाने उलगडून दाखवतात. युवावस्थेत असताना लक्ष्ण पै यांनी गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेतला होता. पोर्तुगीजांचे साडेचारशे वर्षे गोव्याच्या विविध भागांमध्ये राज्य होते. त्याविरुद्ध अनेक तरुण लढत होते, पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करत होते. पै यांनीही स्वत:ला मुक्ती संग्रामात झोकून दिलं. 

पोर्तुगीज त्यांना पकडून तुरुंगात डांबतील म्हणून कुटुंबीयांनी लक्ष्मण पै यांना गुपचूप मुंबईस पाठवून दिले. पै यांनी नंतर जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. एम. एफ. हुसेनही त्याच काळात जे. जे. आर्टमध्ये शिकत होते. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणारा असा हा कलाकार. आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रे त्यांनी काढली, पण मिरवून घेण्याचा सोस त्यांना कधीच नव्हता. अगदी आपल्या चित्रांवरही ते स्वत:चे नाव कधीच टाकत नाहीत. त्याचविषयी त्यांना विचारल्यावर हसतच ते सांगतात, ‘एकदा चित्र काढले की झाले. मग ते माझे तरी कुठे राहते? त्यामुळे मी स्वत: कधीच माझ्या चित्रांना नावे देत नाही. त्याऐवजी त्या चित्रांना ‘आर्ट १’, ‘आर्ट २’ असे मी म्हणतो.’ जगभर भ्रमंती केलेल्या पै यांचा देशोदेशीच्या चित्रसंस्कृतीचा अभ्यासही दांडगा आहे. विशेषत: पॅरीसमधील कलाकृती त्यांना खूप भावतात. पाश्चात्त्य कलाकृती आणि कलावंतांची भारतीय संदर्भात तुलना करताना आपले निरीक्षणही ते नोंदवतात.. आपल्या देशातील कलाकृतींचा दर्जा अतिशय उच्च आहे. विदेशी कलाकृतींच्या, चित्रकृतींच्या, पेंटिंग्जच्या तुलनेत आपण कुठेच मागे नाही. आपल्याकडे अनेक गुणी कलाकार आहेत. नव्या कलावंतांच्या कलाकृतीही वाखाणण्याजोग्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता आहे, मात्र कलाकृतींच्या सादरीकरणाबाबत आपले कलाकार कमी पडतात.लक्ष्मण पै स्वामी विवेकानंद यांचे निस्सीम चाहते आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तिका ते आजही कायम त्यांच्यासोबत बाळगतात. हिंदू धर्माला असलेली ज्ञानाची आणि तत्त्वज्ञानाची बैठक मला खूप भावते, हे तत्त्वज्ञान भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, असे ते आवर्जून सांगतात.गोव्यात ८० च्या दशकात सरकारचे कला महाविद्यालय उभे राहिले. आल्तिनो (पोर्तुगीज काळात प्रत्येक टेकडीच्या भागास आल्तिनो म्हणायचे) येथील मोठ्या पठारावर पूर्वी जंगल होते. तिथे कला महाविद्यालय साकारण्याची त्यांची कल्पना स्वीकारली गेली आणि पै यांच्याच देखरेखीखाली महाविद्यालयाचे बांधकाम उभे राहिले. त्यांनी दहा वर्षे तिथे प्राचार्य म्हणून काम पाहिले. टोकियो, सिंगापूर, बँकॉक, म्युनिर्च, सॅन फ्रान्सिस्को, न्यू यॉर्क, ब्रेमेन, दिल्ली, कोलकाता, मुंबई, गोवा अशा अनेक ठिकाणी पै यांच्या चित्रांचे प्रदर्शन झालेले आहे. कला क्षेत्रातील हा तपस्वी गोव्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्याच्या संध्याकाळीही कलेचीच साधना करतो आहे. गोवा आता बदललाय, कॉस्मोपॉलिटन संस्कृती वेगाने या प्रदेशात स्थिरावते आहे याची थोडी खंतही पै यांच्या बोलण्यात डोकावते. गोव्याच्या कोंकणी भाषेचे त्यांना फार कौतुक. या भाषेचा गोडवा आणि त्याच्या वेगळेपणाने त्यांना कायम भुरळ घातली आहे. त्यांच्या चित्रप्रतिभेमुळे पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांना सन्मान मिळाला असला तरी नावाचा जसा त्यांना कधीच मोह नव्हता, तसाच पुरस्कारांचाही नाही. तथापि, ‘गोमंत विभूषण’ हा गोमंतकीयांचा म्हणजेच मातृभूमीचा पुरस्कार असल्याने त्याविषयी त्यांना विशेष आपुलकी आहे.आपल्या कृतीतून नवोदित कलावंतांपुढे आदर्श घालून देताना पै सांगतात, ‘पुरस्कारांच्या मागे पळण्यात अर्थ नाही. झोकून देऊन काम केले तर पुरस्कार स्वत:हूनच त्या कलाकृतीच्या पायावर डोके ठेवतात. प्रत्येक कलाकराने आपल्या कलेप्रति प्रामाणिक राहिले तर ती कलाकृतीच आपली ओळख बनते. कलाकराला वेगळ्या ओळखीची गरजच नाही..’

 (लेखक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चिफ आहेत.)

 sadguru.patil@lokmat.com