- शशिकांत सावंत
अ वॉल स्ट्रीट जर्नलसाठी माझा पत्रकार मित्र राजेंद्र फडके काम करत असे. एक दिवस प्रकृतीच्या कारणामुळे त्याला असाइनमेण्टवर काम करता येईना. त्याने मला विचारले, ‘तू काम करशील का?’ काम होते दुभाष्याचे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ हे नियतकालिक ‘टाइम’सारखे सहज पाहायला मिळत नसे. अमेरिकन लायब्ररीमध्ये मी ते पाहिले होते. त्याचे स्वरूप अत्यंत रुक्ष असायचे. अनेक वर्षे ते फोटोही छापत नसत. रंगीत छपाई वापरत नसत. पण पत्रकारितेत त्याचा चांगला दबदबा होता. एरिक बेल्मन या वार्ताहराबरोबर मला काम करायचे होते. बेकार झालेल्या गिरणी कामगारांची मुले बिग बझारसारख्या ठिकाणी कशी काम करत आहेत आणि त्यांचे आयुष्य कसे पालटते या स्टोरीवर एरिक काम करत होता. २००७ च्या आसपासची ही गोष्ट. त्या सुमारास बंद पडलेल्या अनेक गिरण्यांच्या जागेवर मॉल्स सुरू झाले होते. आता त्या बेकार कामगारांची मुले मॉलमध्ये काम करत होती. या स्टोरीसाठी मुलांचे आणि त्या पालकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे होते. दिवसाला साधारणपणे दीड-दोन हजार रु पये मिळणार होते. मी हो म्हटले. पहिल्यांदा एरिक बेल्मनची भेट झाली ती बिग बझारच्या खाली. हाफ शर्ट आणि साधी फुल पॅँट असा त्याचा वेश होता. गोरापान, पिंगट डोळे. खास अमेरिकन सेन्स आॅफ ह्युमर असलेला टिपिकल अमेरिकन गृहस्थ. कोणाशीही त्याचे सहज जमत असे. मुंबईचा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा भाग तेव्हा पूर्ण पालटला होता. अनेक गिरण्यांच्या जागेवर मॉल्स सुरू झाले होते. त्यापैकीच बिग बझार हा एक मॉल. लोअर परळ स्टेशनच्या पश्चिमेला. सेवा उद्योगात तो मोडत असल्याने तिथे वस्तू पॅक करणे, बिले बनवणे, साफसफाई करणे या कामासाठी प्रामुख्याने वीस ते बावीस वर्षाची मुले काम करत असत. यात गिरणी कामगारांची मुले होती. अनेकांचे शिक्षण दहावी, बारावीत बंद पडले होते. त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता तशी कमीच होती. ही मुलं तशी चांगल्या घरची आणि सुस्थितीतली असली तरी बेकारांच्या झुंडीत सामील झाल्यामुळे वाममार्गाला लागू शकली असती किंवा कुठलीच शाश्वती नसलेल्या बेभरवशाच्या कामांमध्ये ती अडकली असती. पण या मॉलमुळे अनेक कामगारांच्या मुलांना चांगला रोजगार सुरू झाला होता, तुलनेनं तो सुरक्षित होता. कामाचे तास, पगार याला शिस्त होती. तिथले वातावरण बऱ्यापैकी चांगले होते. गिऱ्हाइकांशी सुसंवाद साधणे, इंग्रजी बोलणे, शिष्टाचार, काही छोटेमोठे कोर्स करण्यासाठी मॉल्सकडूनही प्रोत्साहन मिळायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर कामाची जागा होती. वस्तुस्थितीचे वास्तव चित्रण यावे यासाठी एरिकने खूप कष्ट घेतले. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. झोपडीमध्ये किंवा चाळीत राहणाऱ्या कामगारांना आम्ही भेटलो. अनेक ठिकाणी एरिक बेल्मन इंग्रजीत प्रश्न विचारायचा. त्याचे मराठी करून मी विचारायचो. मग मराठी प्रश्न- उत्तरं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो, सारेच जण एरिकबरोबर फोटो काढून घ्यायचे. गोऱ्या पत्रकारांना नेहमी अनुभवाला येणारी ही गोष्ट. एरिक त्याच्या कॅमेऱ्यातून स्वत:च फोटो काढत असे. त्याचा वेगळा फोटोग्राफर नव्हता. कारण परदेशी नियतकालिकांना मानधनाचे दर ठरलेले असतात. मानधन वाचवण्याचा हा एक मार्ग होता. एरिकने काढलेले फोटो चांगले होते आणि ते वॉल स्ट्रीटमध्ये छापून येत. बोलणे झाल्यानंतर अनेक लोक एरिकचीच मुलाखत घेत. त्याने लग्न का केले नाही? त्याच्या घराचे भाडे किती आहे? - असे प्रश्न त्याला विचारत. तो न कंटाळता हसतमुखाने याची उत्तरे देत असे. याच स्टोरीसाठी एका मुलाच्या घरी जायचे होते. इतर मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. पण या मुलाच्या आईवडिलांना भेटण्यासाठी एरिकने तारापूरला जायचे ठरवले. मुलाचे आईवडील तारापूरला राहत होते आणि तोही सुटीसाठी तिथे गेला होता. मुंबईपासून १०० किलोमीटरवर असलेल्या तारापूरला आम्ही जायला निघालो. खरे तर इतक्या मुलांच्या मुलाखती झाल्यानंतर केवळ एका मुलासाठी इतक्या लांब जाण्याची तशी गरज नव्हती. पण प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपायची आणि कोणतीही गोष्ट राहून जाऊ नये याकडे परदेशी पत्रकारांचा कटाक्ष असतो. एरिकही तसाच होता. तारापूरला मुलाच्या घरच्यांनी आमच्यासाठी जेवण केलेले होते. एरिकला खाली बसून हाताने जेवायची सवय नव्हती. पण तो जेवला. अमेरिकन पत्रकारांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते लवचिकपणे वागतात. अनेक भारतीय पत्रकारांबरोबर मी काम केलेय आणि त्यांचा अहंकार किती मोठा असतो हे मी पाहिले आहे. त्या मानाने ही मंडळी अत्यंत साधी असतात. कुठल्याही परिस्थितीला ते तोंड देतात. जेवण चांगले नव्हते किंवा गरम जेवण मिळाले नाही.. असल्या साध्या साध्या गोष्टींबद्दल ते तक्रारी करत बसत नाहीत. हा एक मोठा संस्कार माझ्यावरही नंतर झाला. इतर मुलांना, पालकांना जे प्रश्न आधी विचारले होते, तेच प्रश्न एरिकने त्या मुलाच्या आईवडिलांना पुन्हा विचारले. तेच तेच प्रश्न न कंटाळता विचारणे ही त्याची खासियत. एखाद्या ठिकाणी चांगली माहिती मिळाली की त्याला खूप आनंद व्हायचा. एरिक म्हणायचा, ‘पत्रकारितेतल्या यशस्वी स्टोरीचे रहस्य तोच प्रश्न न कंटाळता विचारण्यात असतो.’ प्रश्न विचारल्यावर एरिक एका वहीत फक्त एका शब्दाच्या नोंदी करत असे. त्या वाचणे कठीण होते. मी त्याला विचारले, ‘तू शॉर्टहॅण्ड शिकलाहेस का?’ तर तो म्हणाला, ‘नाही, माझे हस्ताक्षर वाईट आहे एवढेच.’ एरिक आधी जपानमध्ये होता. जपानमधून त्याने एक गाडी आणली होती. त्याच्या ड्रायव्हरला ती हळूहळू चालवावी लागे, कारण रस्त्यात बरेच खड्डे आणि उंचवटे होते. गाडीचा तळ जमिनीपासून फारच कमी अंतरावर होता. एके ठिकाणी ट्रॅफिकजाम लागला. आम्ही जवळपास दीड तास विरारजवळ कुठेतरी अडकलो. एरिक जपानसारख्या प्रचंड शिस्तीच्या आणि कार्यक्षम देशातून परतला होता आपल्याकडचे खड्डे, त्यात ट्रॅफिकजाम. त्याला काय वाटत असेल असा प्रश्न मला पडायचा. पण तो मधल्या काळात मित्रांशी फोनवर बोलायचा, मोबाइलवर, लॅपटॉपवर काम करायचा. तो जराही वेळ वाया घालवत नसे. एकदा ड्रायव्हर म्हणाला, ‘साब खानेके लिए बिलकुल पैसे नही देते.’ कारण अर्थात अशी बक्षिसी देणे अमेरिकन कायद्यात बसत नव्हते. याचे कारण मुळात अमेरिकी कायदे अत्यंत कडक. ते मोडले तर शिक्षाही मोठी असते. त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन नागरिकही कायद्याच्या बाहेर फारसा कधी जात नाही. त्याच्याबरोबर अधिक काम केल्यावर माझ्या लक्षात आले की, संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतरही तो मोकळा नसायचा. परत तो सगळे रिपोर्टिंग आधी दिल्लीला आणि वॉशिंग्टनला करायचा. याप्रकारे त्याचाच नव्हे तर ज्या ज्या अमेरिकन पत्रकारांबरोबर मी काम केले त्या सगळ्यांचा दिवस हा झोपेपर्यंत जवळपास पत्रकारितेने व्यापलेला असतो. आर्थिक सुधारणा तर जो नवा भारत घडत होता त्याचे वृत्तांत अर्थात वॉल स्ट्रीट जर्नल, इकॉनॉमिस्ट, टाइम हे सारेच करत होते. त्यामुळे बिग बझारचे किशोर बियाणी यांच्यावर त्याने स्टोरी केली होती. बिग बझार ही बियाणी यांचीच कल्पना. गिरणी कामगारांच्या मुलांचे आयुष्य कसे बदलतेय ही स्टोरी आम्ही केली. वॉल स्ट्रीट जर्नलतर्फेज्या दोन स्टोरीमधून पुलित्झर पारितोषिकासाठी जाणारी स्टोरी निवडली जाणार होती त्यात ही स्टोरी होती. पण ती निवडली गेली नाही. माझे काम दुभाष्याचे होते आणि स्टोरीवर माझे नाव यात नसे. पण पत्रकारितेमधले अनेक चांगले धडे या कामात मिळाले. उदा. न कंटाळता तेच तेच प्रश्न कसे विचारावेत, एखाद्याला बोलते कसे करावे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिकता म्हणजे काय.. अशा कितीतरी गोष्टी त्यात समजल्या. तटस्थपणे निरीक्षण हे एरिकचे वैशिष्ट्य होते. बातमीत घुसायचे नाही आणि निरीक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहीत असली तरी आपली मते त्यात घुसडायची नाहीत. एखादी व्यक्ती झोपडीत राहत असली तरी ‘ती गरीब आहे’ असे आपण म्हणायचे नाही. त्याचे उत्पन्न विचारायचे. आपण स्वत:च निष्कर्ष काढायचे नाहीत. एरिकबरोबर काम करताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे आपण न्यूजमेकर नाही, आॅब्झर्वर आहोत, बातमीचे निरीक्षक आहोत आणि त्याच दृष्टीने आपण काम केले पाहिजे. गिरणी कामगारांच्या मुलांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना तटस्थ राहणे, जितक्या खोलात जाता येईल तितक्या खोलात जाणे, कोणताही तपशील न वगळणे, साऱ्या शक्यता तपासून पाहणे, न कंटाळता दिवसरात्र काम करणे.. असे अनेक धडे नकळतपणे मलाही दिले..
(दीर्घकाळापासून परदेशी लेखक-पत्रकारांचे मार्गदर्शक असलेले लेखक पुस्तकांच्या दुनियेतले जाणते मुशाफिर आहेत)shashibooks@gmail.com