- डॉ. प्रकाश कामत
गीतकार शैलेंद्रच्या बोलक्या लेखणीतून साकार झालेलं पार्श्वगायिका मीनाकपूरच्या हृदयस्पश्री आवाजातील ‘कुछ और जमाना कहता है’ (छोटी-छोटी बातें) हे गीत काय किंवा गीतकार मनमोहन साबिरनी लिहिलेला, लताच्या तरल आवाजातील ‘सारा चमन था अपना, वह भी था एक जमाना’ (आकाश).. हा ‘शेर’ काय! यातलं काहीही कानी पडलं, तरी जाणवायला लागतं, की खरंच तो जमाना काही ‘और’च होता, ज्याचं शब्दांत वर्णन करणं केवळ अशक्य..
हिंदी चित्रपटसृष्टीतील १९३५ ते १९६५ या ३0 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये कोण्या एका गुणी, निगर्वी, प्रसिद्धीपासून सदैव दूर राहिलेल्या ‘अनिल’ नावाच्या संगीतकाराचं संगीत, ‘विश्वासा’स पात्र व्हायचं असं जणू समीकरणच ठरून गेलं होतं. दुसर्या शब्दात सांगायचं झालं तर. अनिलदांचं श्रवणीय संगीत अगदी आजच्या घडीलाही कानी पडलं, की आजच्या बदलत्या काळातील संगीताच्या (?) तुलनेत, मनाची अवस्था.. ‘वो दिन कहाँ गये बता’ (तराना) सारखी न झाली तरच नवल!..
काही वर्षांपूर्वी पुण्यातील ‘नाट्यदर्पण’ या संस्थेने, मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजिलेल्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, त्यांना त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या अनिल विश्वास यांना आमंत्रित केलं होतं. याप्रसंगी अनिलदांचा परिचय रसिकांना करून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या निमित्ताने माझा अनिलदांशी स्नेह वृद्धिंगत झाला. त्यातून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या व त्यांनी संगीतबद्ध केलेल्या, एकाहून एक सुरेल गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
लता-अनिल विश्वास हे एक समीकरण होतं. १९४७ नंतर, लताच्या आवाजाने अनिलदांच्या संगीतात मुक्त संचार केला. थोडक्यात, लताचा सुरेल आवाज हा अनिलदांच्या संगीतातील अविभाज्य घटक बनून राहिला. उदा. ‘प्रीतम तेरा मेरा प्यार’ (गजरे), ‘याद रखना चाँद तारो’ (अनोखा प्यार), ‘मन में किसी की प्रीत बसले’ (आराम, ‘आए थे धडकन लेकर दिल में’ व ‘इस हंसती गाती दुनिया में’ (लाजवाब), ‘हंसले गाले ओ चाँद मेरे’ व ‘मस्त पवन है चंचल धारा’ (जीत), ‘क ैसे कह दूँ बजरिया के बीच’ (लाडली), ‘मोसे रूठ गयो मेरा सांवरिया,’ व ‘बेईमान तोरे नैनवा (तराना), ‘जा मैं तोसे नाही बोलूं’ (सौतेला भाई) इत्यादींसारखी अनेक हृदयस्पश्री गीतं अनिलदांचं श्रेष्ठत्व ठरविण्यास पुरेशी ठरतात.
१९३१ बोलपटांचा जमाना सुरू झाल्यानंतर, चित्रपट संगीताला नवी दिशा देणार्या त्यातही, शास्त्रीय व लोकसंगीताचा सुरेख वापर वेळोवेळी करणार्या या ज्येष्ठ संगीतकाराने आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीत जवळपास ९५ चित्रपटांना उत्तम संगीत दिलं. ‘अनिल बिस्वास’ हे त्यांचं मूळ नाव. अनिलदांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बारिसाल (आजचे बांगलादेशातील) या छोट्या गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शालेय व महाविद्यालयीन जीवन संघर्षाने परिपूर्ण. महाविद्यालयीन जीवनात तर कोलकत्त्याला हॉटेलमध्ये भांडी घासून व रात्री फूटपाथवर झोपून दिवस काढले. असंच एकदा मनोरंजन सरकार नामक एका गृहस्थाने अनिलदांना गाताना ऐकलं व त्यांना एका खासगी मैफलीत गाण्याचं आमंत्रण दिलं. हिंदी, बंगाली, इंग्रजी, उर्दूसारख्या भाषांवर प्रभुत्व असणार्या अनिलदांनी या मैफलीत, सर्वप्रथम गायिलेलं बंगाली भजन हे कालीमातेचं गुणगान करणारं ‘शामा संगीता’वर आधारित होतं. शब्द होते - ‘मांजार आनंदमयी सेकि निरान दे था के..’ पुढे वयाच्या १७ व्या वर्षी ‘आरजू है दम में जब तक दम रहें’ या उर्दू गझलला पहिल्यांदा चाल लावून ती स्वत:च पेश केली. त्यानंतर, त्या काळातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हीरेन बोसच्या आग्रहाखातर १९३४ मध्ये अनिलदा मुंबईत येऊन स्थिरावले. स्वत: संगीत दिलेल्या पहिल्याच चित्रपटात गीत गाणार्या मोजक्याच संगीतकारांमध्ये त्यांची वर्णी लागते. १९३५ मधील ‘धरम की देवी’ हा संगीतकार (व गायक म्हणूनही) त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट. यातील - ‘कुछ भी नही भरोसा, दुनिया है आनीजानी’ हे गीत, गायक म्हणून कारकिर्दीतील ध्वनिमुद्रित झालेलं त्यांचं पहिलं गीत. नंतर- जागीरदार, पोस्टमन, एक ही रास्ता, पूजा, अलीबाबा, औरत, आरजू (१९५0 च्या आधीचे चित्रपट) सारख्या चित्रपटांतून त्यांनी स्वत: संगीत देऊन गाणी गायली. अनिलदांच्या संगीत कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्य म्हणजे ‘महागीत’ (१९३७) या चित्रपटाद्वारे अनिलदांनी पार्श्वगायन पद्धती सर्वप्रथम मुंबईत आणली. याशिवाय - ‘व्हरायटी प्रॉडक्शन्स’ ही संस्था प्रस्थापित करून, आपली पहिली पत्नी आशालता बिस्वासबरोबर काही चित्रपटांची निर्मिती करून, निर्माते म्हणूनही ते चित्रपटसृष्टीत वावरले. असे काही चित्रपट- लाडली, लाजवाब, बडी बहू, हमदर्द, बाजूबंद इ. विशेष म्हणजे, ‘हमदर्द’ चित्रपटाद्वारे चित्रपटसंगीतात ‘रागमालिका’ प्रस्तुत करण्याचा पहिला मान अनिलदांनीच मिळविला.
लता व मन्ना डे यांच्या सुमधूर आवाजातील - ‘ऋतू आए ऋतू जाए’ हे ऋतुंचं महत्त्व सांगणारं युगलगीत हे गौडसारंग, गौड मल्हार, जोगिया व बहार या ४ रागांवर आधारित आहे. ‘बाजूबंद’ चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट अनिलदांनी निर्मित केला असला, तरी संगीत मात्र महंमद शफींचं होतं. रोटी, किस्मत, पहली नजर, अनोखा प्यार, लाडली, तराना, फरेब, हमदर्द, वारीस, परदेसी, सौतेला भाई, आदी अनेक चित्रपटांची नुसती नावे आठवली, तरी अनिलदांच्या संगीताने न्हाऊन निघालेली अगणित गाणी आपसूक डोळ्यांसमोर उभी येऊन ठाकतात. यापैकी ‘किस्मत’ चित्रपटातील गीतांमुळे विशेषत: ‘दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्ताँ हमारा है’ सारख्या जोशपूर्ण देशभक्तिपर गीताने व ‘धीरे धीरे आ रे बादल’ सारख्या २ भागांतील ‘लोरी’ने १९४0च्या दशकात इतिहास घडविला.
या चित्रपटातील सर्वच गीतांनी, कवी प्रदीप व अनिलदा सदोदित आठवणीत राहतील. हा चित्रपट कोलकत्याला रॉक्सी या एकाच चित्रपटगृहात साडेतीन वर्षांहून अधिक काळ चालला होता. तर, यानंतरचा ‘बसंत’ हाही चित्रपट याच चित्रपटगृहात सुमारे दीड वर्षे चालला होता. ‘बसंत’ चित्रपटाचे संगीत ज्येष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांनी दिलं असलं, तरी सर्व गीतांना चाली अनिल विश्वास यांनी लावल्या असल्याचं स्मरतं. पन्नालालजींच्या पत्नी पारूल घोष या अनिलदांची बहीण ज्यांनी या चित्रपटातील सर्व गीतें गायिली होती. ‘अनोखा प्यार’विषयी थोडक्यात सांगायचं झालं, तर या चित्रपटाची नायिका नर्गीससाठी पडद्यावर सर्व गीते, मीनाकपूरने गायिली होती, पण ध्वनिमुद्रिकेवरील हीच सर्व गीते, लताच्या आवाजात प्रस्तुत करण्यात आली होती.
अनिलदा आणि त्या काळातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खाँ यांची घनिष्ट मैत्री होती. मेहबूब दिग्दर्शित डझनभर चित्रपटांना अनिलदांनी संगीत दिलं होतं; पण १९४२ च्या ‘रोटी’ चित्रपटानंतर त्यांचे संबंध दुरावले. सुप्रसिद्ध गजल व ठुमरी गायिका (अख्तरी फैजाबादी) बेगम अख्तर ‘रोटी’ या चित्रपटाची नायिका देखील होती. व अख्तरीबाईंनी ६ गझलाही गायिल्या होत्या. ज्यांच्या ध्वनिमुद्रिकाही प्रस्तुत करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव या चित्रपटातील त्या सर्व गझला काढून टाकण्यात आल्या होत्या. असो. विशेष जाणविण्यासारखी गोष्ट म्हणजे, १९३९-४0च्या मेहबूब खाँच्या ‘औरत’ चित्रपटाला अनिलदांचं उत्कृष्ट संगीत होतं; पण.. पुढे मेहबूब खाँच्या याच चित्रपटाचा ‘री-मेक’ असलेल्या ‘मदर इंडिया’ला मात्र संगीत देण्याची जबाबदारी नौशादजींवर सोपविण्यात आली. ही गोष्ट अनेकांना नवीन असेल.
पुण्यात यशवंत देव यांच्या पंचाहत्तरी सत्कार सोहळ्याला आले असताना, त्यांनी एक आठवण सांगितली. ‘‘झूम झूम के नाचो आज, गाओ खुशी के गीत’ या गीताचा मुखडा मजरूह सुलतानपुरींचा नसून, तो प्रेमधवनचा आहे आणि ‘अंदाज’ (सं. नौशाद) चित्रपटातील हे गीत, ‘अंदाज’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘इप्टा’साठी मी तयार केलं होतं, ज्याला मी स्वत:च्या मूळ चालीत बांधून ते गीत विविध कार्यक्रमांतून स्वत: पेश केलं होतं.’’ अनिलदा हे सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्रांना गुरुस्थानी होते. फारसं कुणाला ठाऊक नसेल, की सी. रामचंद्रांनी अनिलदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, ‘ज्वारभाटा’ (१९४४) चित्रपटात (अभिनेता दिलीपकुमारचा पहिला चित्रपट), पारूल घोषबरोबर- ‘भूल जाना चाहती हूँ’ हे युगल गीत, तर अनिलदांनीच संगीत दिलेल्या ‘वीणा’ (१९४८) चित्रपटासाठी - ‘कोई श्याम रंग कोई गोरी’ हे सोलो गीत गायिलं.
१९४0च्या दशकातील अभिनेता- गायक सुरेंद्रला गाण्याची जास्तीत जास्त संधी अनिलदांमुळेच प्राप्त झाली. उदा. ग्रामोफोन सिंगर, अलीबाबा, जीवनसाथी, औरत, जवानी इ. अशा चित्रपटांचा नामनिर्देश करावा लागेल. गायक-संगीतकार एस. डी. बातिश (बर्मन नव्हे) नी गायिलेलं, ‘आँखे कह गयी दिल की बात’ (लाडली) हे गीत उल्लेखनीय वाटतं.
एका पार्टीच्या प्रसंगी सुधा मल्होत्रा गात असताना अनिलदांनी तिला अचूक हेरलं व तिच्या आवाजाने प्रभावित होऊन, ‘आरजू’ (१९५0) चित्रपटासाठी ‘मिला गए नैन’ हे गीत तिच्याकडून गाऊन घेऊन, ध्वनिमुद्रित केलं. ज्या गीताद्वारे तिने गायिका म्हणून आपली सांगीतिक कारकीर्द सुरू केली. तसेच, गायिका संध्या मुखर्जी (चित्रपट- तराना, अंगूलीमाल) हिलाही संधी मिळवून दिली.
गायक किशोरकुमारने गायिलेली - ‘हुस्न भी है उदास उदास’ (फरेब) हे व ‘मेरे सुखदुख का संसार’ अशी धीर गंभीर गीतं, त्याच्या अत्युत्कृष्ट गीतांपैकी ठरावी. याशिवाय ‘तकदीर की चीडिया बोलें’ (पैसा ही पैसा) हे किशोरकुमारचं गीतही निश्चितच मनास भुरळ पाडणारं आहे.
विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे - स्व. मुकेश व स्व. तलत महमूद या दोघांनी आपली (गायक म्हणून) सांगीतिक कारकीर्द एकाच वर्षी म्हणजे १९४१ मध्ये सुरू केली व गंमत म्हणजे दोघांनाही खरी प्रसिद्धी अनिलदांमुळेच लाभली. मुकेशला - ‘दिल जलता है, तो जलने दे’ (पहली नजर) या गीताने, तर तलत महमूदला - ऐ दिल मुझे ऐसी जगह’ (आरजू) या गीताने त्यातही मुकेश व तलत हे अनिलदांचे खास आवडीचे गायक, तर या दोघांच्याही मनात अनिलदांविषयी नितांत श्रद्धा. विशेष म्हणजे, मुकेशने अनिलदांना त्यांच्या अगदी शेवटच्या ‘छोटी-छोटी बातें (१९६५) चित्रपटापर्यंत साथ दिली. वाद्यांच्या साथ-संगतीशिवाय, अनिलदांच्या भारावून टाकणार्या चालीने संपन्न झालेलं, मुकेशच्या आवाजातील - ‘जिंदगी ख्वाब है, था हमें भी पता’ (छोटी-छोटी बातें) हे गीत, मुकेशच्या संगीत कारकिर्दीतील वरच्या क्रमांकाचे गीत ठरू शकेल. आरजू, आराम, तराना, दोराहा, वारीस, जासूस इ. सारख्या चित्रपटांतून तलत महमूदकडून एकाहून एक हृदयस्पश्री गीते गाऊन घेणार्या अनिलदांनी, त्याच्याकडून ‘भले तुम रूठ जाओ’, ‘भूल जाओ ऐ मेरे’, ‘फिर प्यार किया फिर रोया’ यांसारखी गैरफिल्मी गीतंही गाऊन घेऊन ती ध्वनिमुद्रित केली.
अनिलदांच्या संगीतात महंमद रफींच्या आवाजाला फारसं महत्त्व प्राप्त होऊ शकलं नाही, तरीही जाता-जाता हीर, पैसाही पैसा, अभिमान, संस्कार, शिकवा (अपूर्ण चित्रपट) यांसारख्या चित्रपटांसाठी रफींनी तुरळक गीतं गायिली. प्रत्यक्ष जीवनातील सहचारिणी असलेल्या (गायिका) मीनाकपूरने - अनोखा प्यार, मेहमान, परदेसी, चार दिल चार राहें, छोटी-छोटी बातें अशा चित्रपटांतून आपला उसना आवाज दिला. परदेसी चित्रपटातील ‘रसिया रे मन बसीया रे’ व ‘रिमझिम बरसे पानी’ ही खास उल्लेखनीय गीते, संगीतकार सी. रामचंद्र यांनी उत्तम संगीत दिलेल्या ‘अनारकली’च्या ३-४ वर्षं आधी ‘अनारकली’ याच नावाने चित्रपट निर्मित करण्यात येणार होता, ज्याची संगीताची जबाबदारी अनिलदांवर येऊन पडली होती. या चित्रपटाचा काही भाग चित्रीतही झाला होता; पण दुर्दैवाने तो अपूर्ण राहिला. मात्र, या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित केलं गेलेलं, लताच्या मुलायम आवाजातील - ‘अल्हाह भी है मल्लाह भी है’, हे संवेदनशील गीत, अनिलदांनी जसंच्या तसं, मान (१९५४) या चित्रपटासाठी वापरलं. लताच्या खास आवडीच्या गीतांपैकी ते एक मानलं जातं. गायिका आशा भोसलेंनीसुद्धा अनिलदांच्या हीर, अभिमान, संस्कार, पैसाही पैसा इ. चित्रपटांतून, तर अभिनेत्री/ गायिका सुरैयाने आपल्या जात्याच सुमधूर आवाजाने - गजरे, दो सितारे, वारीस चित्रपट गाजवले.
१९६१ हे वर्ष अनिल विश्वास यांच्या जीवनातील वाईट वर्ष ठरलं. याच वर्षी त्यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं, तर नंतर एक महिन्याच्या आतच वायुसेनेतील त्यांच्या मुलाचं, विमान अपघातामुळे निधन झालं. या गोष्टींचा त्यांच्या मनावर व पर्यायाने संगीत कारकिर्दीवर परिणाम झाल्यामुळे, नंतर हाती घेतलेले चित्रपट उरकून १९६५ मध्ये त्यांनी स्वेच्छेने नवृत्ती घेतली. त्या वर्षांतील ‘छोटी-छोटी बातें’ हा स्व. मोतीलालचा चित्रपट संगीतकार म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. ‘कुछ और जमाना कहता है’ (मीना कपूर गायिका) व मुकेश-लताचं युगलगीत- ‘जिन्दगीका अजब फसाना है’ सारखी गीतं, आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता.
मुंबईत असताना त्यांनी ‘मेलडी स्कूल’ची स्थापना केली, ज्यायोगे विभिन्न संगीतकार बैठकीच्या निमित्ताने एकत्र येत असत. या ‘स्कूल’चे प्रमुख तीन आधारस्तंभ होते. स्व. सी. रामचंद्र, मदन मोहन व रोशन १९६३ मध्ये, आकाशवाणीवर अनिलदा राष्ट्रीय वाद्यवृंदाचे संचालक बनले. एक तपानंतर म्हणजे १९७५ मध्ये, आकाशवाणीतून नवृत्त होऊन, दोन वर्षें, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते सांस्कृतिक मार्गदर्शक, तर त्यानंतर ३ वर्षांनी ‘इनरेको’ या ध्वनिमुद्रिका प्रस्तुत करणार्या कंपनीत अनिलदा हे संगीत विभागाचे कलाप्रमुख ही पदही भूषविते झाले. त्यानंतर मात्र अनिल विश्वास यांनी उर्वरित सुखा-समाधानाचे आयुष्य दिल्लीत व्यथित केलं.
अनिलदांची छोट्या पडद्यावरची ओळख करून द्यायची झाल्यास, दूरदर्शनवरील अगदी पहिल्याच गाजलेल्या ‘हमलोग’ या मालिकेला संगीत त्यांचचं होतं.
.. हिंदी चित्रपटसृष्टीच्या जगतातील, संगीतकाररुपी ‘महर्षी’ असलेल्या अनिल विश्वास यांच्या ‘जन्मशताब्दी’ची सांगता आज रोजी पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने.. अनिलदांनीच स्वरबद्ध केलेलं (गीतकार- बहजाद लखनवी) व लताच्या हृदयस्पश्री आवाजाने साकार झालेलं.. ‘तुम्हारे बुलाने को जी चाहता है’ (लाडली) हे अजरामर गीत ऐकल्यावर माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य चाहत्यांना, त्यांनी पुन्हा जन्म घेऊन, त्या ‘सुवर्ण’युगाची आठवण करून द्याविशी इच्छा, मनोमनी वाटत असणार यात शंका नाही..’’
(लेखक भारतीय चित्रपट संगीताचे गाढे अभ्यासक व संग्राहक आहेत.)