- निळू दामले
अमेरिकेनं इराकमधे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचे रणगाडे आणि लष्करी ठाणी यांच्यावर हवाई हल्ले केले. आयसिसनं सिंजार डोंगरी विभागात पन्नासेक हजार माणसांची कोंडी केली होती. त्यांचं अन्नपाणी तोडलं होतं. माणसं तहानभुकेनं मरू लागली होती. ही माणसं ज्यू, ख्रिस्ती, पारशी होती. इराकच्या हिशोबात अल्पसंख्य. आयसिसनं त्यांना निर्वाणीचा संदेश दिला होता, मुसलमान व्हा; नाही तर शिरच्छेद करू. शिरच्छेद, यमयातना, छळ यांच्या घटना व्हिडीओ चित्रित करून लोकांना दाखवल्या जात होत्या. या माणसाना अमेरिकन सरकारतर्फे अन्नपाण्याच्या पिशव्या हवेतून टाकल्या जात होत्या. परंतु, आयसिसचे सैनिक तेही करू देईनासे झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हवाई हल्ले करून कोंडी फोडण्याचे आदेश दिले होते.
इराकमधे यादवी सुरू आहे. नुरी मलिकी यांच्या सरकारनं गेली सात-आठ वषर्ं अतोनात अत्याचार केले. सुन्नी लोकांविरोधात, कुर्दांच्या विरोधात. जे कोणी मलिकी यांना विरोध करतील, त्या सर्वांना मलिकी यांनी निकाली काढलं. म्हणजे शिया असूनही जे लोक अत्याचाराला विरोध करत होते, त्या शिया लोकांचंही कांडात मलिकी यांनी काढलं. जनता त्रस्त होती. विशेषत: सुन्नी जनता संकटात होती. या स्थितीचा फायदा आयसिस या दहशतवादी सुन्नी संघटनेनं घेतला. सीरियात जन्मलेल्या आणि वाढलेल्या आयसिसनं तणावग्रस्त इराकमधे प्रवेश केला. सात-आठ हजार सशस्त्र दहशतवादी, रणगाडे, तोफा इत्यादींच्या साह्यानं आयसिस इराकच्या एकेका विभागाचा ताबा घेत सुटलं. या मोहिमेत ते उत्तरेला कुर्दिस्तानात पसरत असताना वाटेत सिंजार या डोंगरी भागातल्या लोकांची कोंडी आयसिसनं केली होती.
आयसिसच्या विरोधात लढायची, त्यांना अटकाव करण्याची जबाबदारी इराक सरकारवर आहे. परंतु, इराक सरकार या बाबतीत असून नसल्यासारखं आहे. एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत मलिकी यांच्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळाली; परंतु पूर्ण बहुमत मिळालं नाही. मलिकी यांची अपेक्षा आहे, की राष्ट्रपतींनी सर्वात मोठा पक्ष म्हणून मलिकना सरकार बनवण्यास बोलवावं. राष्ट्रपती तसं करत नाहीयेत; कारण त्यांच्यावर अमेरिका, इराण यांचा दबाव आहे. मलिक यांच्याऐवजी सर्वाना बरोबर घेऊन चालू शकणारा पुढारी असावा, असं त्यांचं मत आहे. परंतु, मलिक सत्ता सोडायला तयार नाहीत. ते तिस:यांदा पंतप्रधान होऊ इच्छितात. सैनिक, पोलीस, परदेश इत्यादी सर्व महत्त्वाची खाती मलिक यांच्या हातात आहेत.
आयसिसचं आव्हान मोडायची ताकद फक्त अमेरिकेत आहे. अमेरिकेला इराकमध्ये स्वारस्य आहे. इराकचाच एक भाग असलेल्या कुर्दिस्तानात अमेरिकेनं पाय रोवलेला आहे. तिथं अमेरिकेचा दूतावास आहे. अमेरिकन लष्करी अधिकारी कुर्दिस्तानच्या पेशमेर्गा या सुरक्षा दलाला सल्ला देतात. कुर्दिस्तानातले कुर्द लोक अनेक वर्षे स्वतंत्र देश मागत आहेत. आजवर इराकनं, सद्दाम हुसेन यांनी कुर्द लोकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. अमेरिका कुर्दिस्तानच्या मागं उभी आहे. कुर्दिस्तान स्वतंत्र होण्यात शेजारच्या तुर्कस्तानलाही स्वारस्य आहे. भविष्यात हा एक स्वतंत्र देश उभा राहिला, तर या भागात अमेरिकेला एक तळ मिळेल; पण त्यासाठी अमेरिका इराकमधे सैन्य घुसवायला आज तयार नाही. याआधी सद्दामचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेनं इराकवर स्वारी केली होती. त्या भानगडीत अमेरिकेचे पाचेक हजार सैनिक मारले गेले होते. अमेरिकन जनता त्यामुळं खवळली होती. आता ती चूक करायला अमेरिका तयार नाही. हवाई हल्ले करण्यात अमेरिकेची माणसं मरत नसल्यानं ती वाट अमेरिकेनं घेतली आहे.
आजघडीला इराकमध्ये कसंही असलं तरी एक सरकार अस्तित्वात आहे. कुर्दिस्तान हा अजूनही इराकचाच एक स्वायत्त असला तरी अंगभूत विभाग आहे. कुर्दिस्तानमधे शस्त्र पाठवायची तर इराक सरकारची परवानगी घ्यावी लागते. इराक सरकार त्याला सहजासहजी तयार होत नाही. कुर्दिस्तान फुटून निघणं इराकला नकोय. त्यामुळंच हवाई हल्ले, शस्त्रं पुरवणं आणि सल्लामसलत यापुरतंच अमेरिकेनं स्वत:ला मर्यादित ठेवलं आहे.
अमेरिकेनं शस्त्र ओतून व इतर वाटांनी समजा आयसिसला रोखलं तरी त्यामुळं इराकची सध्याची दिशा बदलेल असं दिसत नाही. आयसिस ही दहशतवादी संघटना असली तरी तिला इराकमधल्या सुन्नींचा पाठिंबा आहे. कारण सुन्नींना इराकमधे यापुढं शियांची सत्ता नकोय. इराक हा बहुसंख्य शियांचा देश आहे. सद्दाम हुसेन सुन्नी असूनही त्यानं दादागिरी करून इराकवर राज्य केलं. शियांना ते मंजूर नव्हतं. त्यामुळंच अमेरिकेने सद्दामला मारलं तेव्हा शिया मंडळी पाहुण्याच्या काठीनं साप मरत असल्यानं खूष होती. सद्दाम जाऊन त्या जागी नुरी मलिक या कर्मठ शियाचं राज्य आल्यानं शिया मंडळी खूष झाली. अशा स्थितीत सुन्नी मंडळी नाराज आहेत. पहिल्या महायुद्धानंतर इराक या देशाची निर्मिती झाली तेव्हाच सुन्नी नाराज होते. आता आयसिसच्या निमित्तानं त्यांना शियांच्या जोखडातून मुक्त होऊन आपला स्वतंत्र देश तयार करण्याची संधी मिळतेय.
सुन्नींचा स्वतंत्र देश निर्माण होण्याच्या दिशेनं इराक निघालंय. या खटाटोपात कुर्दांना स्वतंत्र देश द्यायला सुन्नी तयार होतील. आणि आपोआप शियांचा तिसरा देश तयार होईल. इराकची त्रिभागणी होईल. ऑटोमन साम्राज्यात होता तोवर इराकमधे विविध समाज आणि धर्मांमधे एक तोल होता, सामंजस्य होतं. ऑटोमन साम्राज्य सुन्नी इस्लामला मानणारं असलं तरी त्या साम्राज्याचा मुख्य भर आर्थिक समृद्धीवर होता. त्यामुळं ख्रिस्ती, पारशी, ज्यू इत्यादी उद्योगी मंडळींना साम्राज्यानं अभय दिलं होतं. एक जिङिाया कर सोडला तर इतर धर्मीयांना विशेष त्रस नव्हता. बगदाद हे जगातलं एक समृद्ध कॉस्मोपॉलिटन शहर होतं. ऑटोमन साम्राज्य मोडल्यावर अरब देश वेगळे झाले. त्या खटाटोपात अनेक वर्षे सुप्त असलेले शिया-सुन्नी तणाव, मुसलमान व बिगर मुसलमान यांच्यातले तणाव उफाळून आले. राजकारण, सत्तास्पर्धा आणि सत्तेची हाव यापोटी वरील तणाव आणखी तीव्र करण्यात आले. त्याचा परिणाम आता दिसतोय.
इराण या शिया देशाला इराक हा शिया देश आपल्याच अंगणातलं एक घर वाटतं. तिकडं सुन्नी सौदी अरेबियाला इराकमधले सुन्नी आपल्या हाताशी असावेत असं वाटतं. इराक आणि सौदी अरेबिया त्यामुळंच इराकच्या संघर्षात तेल ओतत आहेत. देश त्रिभागल्यानंतर तयार होणारं शियास्तान इराणला हवंय आणि सुन्निास्तान झालं तर ते आपल्या ताटाखाली असावं असं सौदी सरकारला वाटतंय. इराण आणि सौदीमधे जेव्हा मांडवल होईल तेव्हा इराकमधला संघर्ष थांबेल. अर्थात तेही इतकं सोपं नाही. कारण आयसिसचा इस्लाम सौदी सत्तेचा विरोधक असण्याचीही शक्यता आहे.
आयसिस किती काळ टिकते, यावर इराकचं भवितव्य अवलंबून आहे. इराण, सौदी आणि अमेरिका आयसिसला आटोक्यात आणू शकले तर इराक प्रश्नाची तड लागेल.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)