अभूतपूर्व गदारोळ : आवाजी मतदानाने तरले सरकार; राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची भाजपावर नामुष्की; सेना विरोधी बाकावर
संदीप प्रधान - मुंबई
शिवसेना या मित्रपक्षाने पाठिंबा द्यावा याकरिता अखेरच्या क्षणार्पयत प्रयत्न करून आलेले अपयश, ‘नॅचरली करप्ट पार्टी’ अशी टीका केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची आलेली नामुष्कीची वेळ, बहुजन समाजाला मुख्यमंत्रिपद नाकारल्याने भाजपाच्या आमदारांमध्ये असलेली धुसफूस या पाश्र्वभूमीवर राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने गोंधळात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने ‘ढकलपास’ करून घेतला आणि प्रस्ताव मतविभाजनास (आमदारांचा हेडकाउंट) घेण्याचे टाळले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठराव जिंकला पण विश्वास गमावला, अशी दारुण परिस्थिती ओढावून घेतली आहे.
कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापनेकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस ठासून सांगत होते. राष्ट्रवादीशी पाट लावण्यापेक्षा अविवाहित राहणो पसंत करेन, या भाषेत ते भूमिका मांडत होते. त्यामुळे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याकरिता शिवसेना या जुन्या मित्रपक्षाने पाठिंबा द्यावा, याकरिता अखेरच्या क्षणार्पयत प्रयत्न सुरू होते. अगोदर शिवसेनेसमोर केंद्रीय मंत्रिपदाचे गाजर धरले गेले. त्यानंतर महाराष्ट्राबाबत अरुण जेटलींच्या माध्यमातून वाटाघाटी सुरू केल्या गेल्या. मंगळवारी रात्री उशिरार्पयत वाटाघाटी सुरू होत्या. बुधवारी सकाळी शिवसेनेने सरकारला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व अन्य नेते सरकारला थेट मतदान करण्याची भाषा करू लागले. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार टिकवल्याचे दिसले तर टीकेचा भडिमार होणार, हे भाजपाला दिसू लागले.
विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सर्वप्रथम विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा विषय पत्रिकेवर होता. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार अनुक्रमे विजय औटी व वर्षा गायकवाड यांचे अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे हरिभाऊ बागडे अध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले. त्यानंतर कामकाज पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा विषय होता. मात्र हा विषय अगोदर मंजूर केला तर शिवसेना विरोधी पक्षात बसली आहे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला आहे, हे स्पष्ट दिसेल म्हणूनच की काय अध्यक्षांनी अगोदर सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे सदस्य विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचा आग्रह धरू लागले, तर याच पदावर दावा केलेले काँँग्रेसचे सदस्यही उठून वेलमध्ये दाखल झाले. या गोंधळात अध्यक्ष बागडे यांनी भाजपाचे सदस्य आशिष शेलार यांना सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले. त्यावर आवाजी मतदान घेऊन विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. विरोधकांनी व विशेषकरून काँग्रेसने पोलची मागणी केल्यानंतरही ही मागणी करण्यास विलंब झाल्याचे सांगून आमदारांचा हेडकाउंट टाळला.
भाजपा सरकार अल्पमतात असल्याने त्यांनी आपल्याकडे 145चा जादूई आकडा असल्याचे हेडकाउंट करून सिद्ध करायला हवे होते. मात्र तसे केले असते तर शिवसेना विरोधात मतदान करीत असून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आहे, हे स्पष्ट होऊन मतदारांमध्ये छी थू होईल म्हणून कायदेशीरदृष्टय़ा वैध असलेला आवाजी मतदानाचा मार्ग स्वीकारला आणि नैतिकतेला तिलांजली दिली, अशी टीका होत आहे.
काँग्रेस, सेनेने रोखली राज्यपालांची वाट
विश्वासदर्शक ठरावाला घटनाबाह्य ठरवत काँग्रेस आणि शिवसेनेने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची गाडी अडवली. या वेळी उडालेल्या गोंधळातून वाट काढत राज्यपालांनी कसाबसा विधानसभेत प्रवेश केला.
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर पोलची केलेली मागणी मान्य केली नाही तसेच विरोधी पक्षनेतेपदावर केलेला दावा फेटाळल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सदस्यांनी विधान भवनच्या पायरीवर बसून घोषणाबाजी सुरू केली. थोडय़ाच वेळात शिवसेनेचे सदस्य तेथे दाखल झाले. आता आपण कुठे व कसे आंदोलन करायचे याचा विचार शिवसेनेचे आमदार करीत होते. तेवढय़ात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मोटारीतून आगमन झाले. मुख्य प्रवेशद्वारापाशी त्यांची मोटार शिवसेनेच्या आमदारांनी अडवली. मात्र त्या वेळी राज्यपाल हे मोटारीत बसून होते.
पोर्चमध्ये राज्यपालांची मोटार दाखल झाली तेव्हा ‘राज्यपाल चले जाव’ अशा घोषणा काँग्रेसचे सदस्य देत होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही विधान भवनच्या पायरीवर बसून त्या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. राज्यपाल विधान भवनात प्रवेश करीत असताना पाय:यांवर काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांची वाट रोखून धरली. विधान भवनातील सुरक्षारक्षक आणि काँग्रेस सदस्य यांच्यात प्रचंड रेटारेटी सुरू होती.
विशेष म्हणजे राज्यपालांचे स्वागत करायला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख वगळता सत्ताधारी पक्षाचे कुणी नव्हते. अगदी उशिरा गिरीश महाजन व दोन-चार सदस्य हे राज्यपालांच्या संरक्षणाकरिता दाखल झाले होते. त्यातच वाहिन्यांचे शेकडो कॅमेरे ही दृश्ये टिपण्याकरिता त्याच रेटारेटीत सहभागी झाले होते. त्या गोंधळातून राज्यपाल कसेबसे विधान भवनात पोहोचले. मात्र तोर्पयत त्यांच्या हाताला इजा झाल्याचे समजले. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळीही घोषणाबाजी सुरू होती.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
हिंमत असेल
तर पुन्हा
विश्वासदर्शक ठराव मांडा -
सेनेचे आव्हान
हिंमत असेल तर भाजपा सरकारने पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले. जे काही घडले तो लोकशाहीचा खून होता. मतविभाजनाची मागणी सेनेने केलेली होती, पण अध्यक्षांनी सरकारला अभय दिले. हे घटनाबाह्य आहे. विश्वासदर्शक ठराव पुन्हा मांडावा अशी मागणी सेना राज्यपालांना भेटून करणार आहे. त्यावेळी काँग्रेसला सोबत घेण्याचाही विचार करू, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षांनी वेळीच पोल मागितला नाही
- अध्यक्षांची माहिती
प्रस्ताव मांडल्यानंतर आपण अनुकूल असतील त्यांनी ‘होय’ व प्रतिकूल असतील त्यांनी ‘नाही’ म्हणावे असे म्हटले होते. प्रस्तावास ज्यांचा विरोध होता त्यांनी, प्रतिकूल असतील त्यांनी ‘नाही’ म्हणावे, असे म्हणताच पोलची म्हणजे मतविभाजनाची मागणी करायला हवी होती. मात्न तसे झाले नाही, असे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले.
अविश्वास प्रस्ताव आणा, बहुमत सिद्ध करून दाखवू
पद्धत आणि परंपरेनुसार विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होते. आधीही अनेकदा तसे विधानसभेत झालेले आहे. सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा, आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
..तर नामुष्की !
अल्पमतातील फडणवीस सरकारला
कपात सूचनेचा अपवाद सोडला तर कारभार करताना कुठलीही अडचण येणार नाही. अगदी एक रुपयाची कपात सूचना स्वीकारली गेली आणि ती मतास टाकल्यानंतर त्यात सरकारचा पराभव झाला, तर सरकारवर राजीनाम्याची नामुष्की ओढावू शकते.
शिवसेनेपुढे यक्षप्रश्न
विश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने येत्या काही महिन्यांत मंत्रिमंडळ विस्तारात काही हाती लागल्याने सेनेने विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकावर उडी मारण्याचा विचार केला तर तो सेनेकडून शिवसैनिक आणि मतदार यांच्या विश्वासावर स्वत:च्या हाताने विस्तव ठेवण्याचा प्रयत्न असेल.
आज घडला तो घटनाबाह्य प्रकार
काँग्रेसचा आरोप
सरकारने आज विधानसभेत विश्वासमत जिंकले, असे म्हणणो हे घटनाबाह्य असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, याविरुद्ध काँग्रेस पक्ष राज्यपालांकडे दाद मागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली सरकारने सर्वच नीतीनियमांची पायमल्ली केली असल्याने राज्यपालांनी अभिभाषण करू नये, अशी मागणी आम्ही केली होती, असे समर्थन त्यांनी केले. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर विरोधी पक्षाने मतदानाची मागणी केली होती. मात्न विधानसभा अध्यक्षांनी आवाजी मतदान घेतले. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.
सहामाही जीवदान
फडणवीस सरकारला आणखी सहा महिन्यांसाठी तर निश्चितच अभय मिळाले आहे. कारण नियमानुसार सरकारने एकदा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विरोधकांना सरकारविरुद्ध आणखी सहा महिने अविश्वास ठराव आणता येणार नाही.
काय घडले, कसे घडले ?
10:00 विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड
10:30रामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात, मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली.
10:43आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. आवाजी मतदानाने ठराव मंजूर, सरकार तरले.
10:45विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड. शिवसेना विरोधी बाकावरच बसणार.
01:11शिवसेनेच्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज 1क् मिनिटांसाठी तहकूब.
01:15माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. आवाजी मतदानाविरोधात उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले.
01:30हिंमत असेल तर पुन्हा मतदान घ्या, असे आव्हान रामदास कदम यांनी भाजपाला दिले.
03:4003:40 : राज्यपालांनी अभिभाषणाला जाऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली.
04:07राज्यपालांची
गाडी रोखली.
04:15राज्यपालाचे
अभिभाषण सुरू
04:50अभिभाषणादरम्यान काँग्रेसचा सभात्याग.
06:40राज्यपालांना धक्काबुक्की करणारे 5 आमदार निलंबित