रत्नागिरी : गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असतानाच आज सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला संततधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या पावसाने व वेगवान वाऱ्याने आज मच्छिमारीला ब्रेक लावला असून, व्यवसाय ठप्प झाला आहे. विचित्र वातावरणाबाबत हवामान खात्याचा कोणताही इशारा नसतानाही मच्छिमारांनी सतर्कतेची भूमिका घेत मच्छिमारीला जाणे टाळले. त्यामुळे आज मच्छिमारी व्यवसायातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.रत्नागिरी शहरातील सर्वांत मोठ्या मिरकरवाडा मच्छिमारी बंदरात आज सर्व मच्छिमारी नौका नांगरलेल्या होत्या. याबाबत मच्छिमार नेते निसार दर्वे यांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवत होते. त्यामुळे मच्छिमार आधीच सावध होते. काल सायंकाळी खोल समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारी नौका बंदरात परतल्या आहेत. रत्नागिरीच्या या बंदरात दर शुक्रवारी मच्छिमारी नौका साप्ताहिक सुटी घेत असल्याने आज सर्व मच्छिमारी नौका बंदरात आहेत. शुक्रवारी रात्री पुन्हा या नौका समुद्रात मच्छिमारीसाठी जातात. मात्र, वादळी वारा व पावसाचा जोर पाहता आज या नौका मच्छिमारीस जाणार नाहीत. वातावरणात नेमका काय बदल झाला, समुद्रातील पाण्याचा करंट कोणत्या प्रकारचा आहे, याबाबत मच्छिमारी खात्याकडून अद्याप तरी कोणतीही माहिती मच्छिमारांना प्राप्त झालेली नाही. तसेच धोक्याचा इशाराही मिळालेला नाही. त्यामुळे उद्या (शनिवारी) वातावरणाचा अंदाज घेत व पाण्याचा करंट लक्षात घेऊन मच्छिमारीस जायचे की नाही, याबाबत मच्छिमार निर्णय घेतील, असे दर्वे म्हणाले. याबाबत हवामान खात्याने काही इशारा पाठविला आहे काय, असे विचारता अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे रत्नागिरीचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)फयान अन मच्छिमारी...सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीत फयान वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. त्यावेळी अनेक नौका खोल समुद्रात मच्छिमारीसाठी गेल्या होत्या. त्यातील काही नौका बंदरात सुरक्षितपणे दाखल झाल्या. मात्र, काही नौका खोल समुद्रात संकटात सापडल्या होत्या. तीन ते चार नौका बुडाल्या. त्यातील खलाशांचाही भयावह मृत्यू झाला होता. या आठवणी वादळी वाऱ्यांच्यावेळी नेहमीच ताज्या होतात. यावेळीही फयानची आठवण झाल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळले. वादळीवाऱ्यामुळे नौका बंदरातच : वांदरकरगेल्या चार दिवसांपासूनच वातावरणात बदल झालेला आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच सागरी वाऱ्यांचा जोरही वाढला आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार मोठ्या मच्छिमारी नौका, तर दीड हजार छोट्या मच्छिमारी नौका असून, रत्नागिरी व नाटे या बंदरातच केवळ शुक्रवारी सुटी घेतली जाते. जयगड, हर्णै बंदरात शुक्रवारी सुटी नसते. आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच वादळी वाराही होता. कोणताही इशारा नसतानाही मच्छिमारांनी स्वत:हून धोका लक्षात घेत मच्छिमारीस जाणे टाळले, अशी माहिती मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी दिली. धोक्याचा इशारा नसताना हवामानात बदल--हवामान खात्याकडून कसलाही इशारा नाही.मत्स्य व्यवसाय खातेही वादळी वाऱ्याबाबत अनभिज्ञ.संततधार पाऊस रात्रीपर्यंत सुरूच.सावध असल्याने समुद्रात जाणे टाळले.धोक्याचा इशारा नसताना आलेल्या वारा पावसाने नुकसान. नौका बंदरातच परतल्या, अंदाज घेतल्यानंतर पुन्हा प्रवेश करणार. खोल समुद्रात गेलेले मच्छिमार परतले.पावसामुळे आंबा मोहोरावर प्रादुर्भावरत्नागिरी : सकाळपासून अचानक सुरू झालेला पाऊस दिवसभर कोसळत असल्याने जिल्ह्याच्या आंबा पिकावर त्याचा परिणाम होणार आहे. काही भागात मोहोरास प्रारंभ झाला होता. मात्र, पावसामुळे तो कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या मोहोरावर बुरूशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आंब्याचा हंगाम लांबण्याबरोबर प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या हूडहूड व निलोफर वादळामुळे यावर्षी थंडी सुरू होण्यास विलंब झाला. नोव्हेंबरच्या दहा तारखेनंतर थंडी सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु थंडी सुरू होण्याऐवजी पाऊस सुरू झाल्याने पुन्हा एकदा आंबापीक धोक्यात आले आहे. जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्याने पीक विलंबाने येण्याची शक्यता आहे. बागांमध्ये किरकोळ स्वरूपात मोहोरास प्रारंभ झाला होता. मोहोराचे प्रमाण १० टक्के होते. तुडतुड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या फवारणीचा प्रभाव नष्ट झाल्याने खर्च वाया गेला आहे. (प्रतिनिधी)जिल्हाभरात सर्वत्र पाऊस झाला आहे. पावसामुळे निर्माण झालेला गारवा आणि शिवाय जमिनीत निर्माण झालेला ओलावा यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे. एकूणच आंबापीक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबापीक लवकर आल्यास चांगला दर मिळून शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळते. परंतु आंबा हंगामच आता उशिरा येण्याचा संभव आहे. शिवाय काहीवेळा मे मध्ये पाऊस पडतो. त्यामुळे एकूणच पीक नैसर्गिक आपत्तीत सापडले आहे. शिवाय काही ठिकाणी झालेल्या वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या पडणे किंवा झाडे मोडण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार, रत्नागिरी.
वाऱ्याने मासेमारीला ब्रेक--पावसामुळे आंबा मोहोरावर प्रादुर्भाव
By admin | Updated: November 14, 2014 23:10 IST