किरण अग्रवाल
मोदींच्या त्सुनामीपुढे जिथे भलेभले गड कोसळले तिथे उत्तर महाराष्ट्रात वेगळा निकाल लागणे शक्यच नव्हते. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात व रोहिदास पाटील यांच्यासारख्या मातब्बरांचे नेतृत्व लाभूनही आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागल्याचे पाहता भविष्यकालीन राजकीय हवेची दिशा स्पष्ट होऊन गेली आहे.नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर २०१४ प्रमाणेच यंदाही भाजप-शिवसेनेनेच शत प्रतिशत कब्जा राखला आहे खरा; पण यातील किमान दोनेक जागा तरी आघाडीने निव्वळ अतिआत्मविश्वासातून गमावल्या आहेत. नाशिक विभागात भाजपने यंदा दिंडोरी, नगर व जळगाव येथील तीन विद्यमान खासदारांना घरी बसवले. त्यातून समोर आलेल्या नाराजीचा लाभ प्रतिस्पर्ध्यांना घेता आला नाही. नाशिक, धुळे, नंदुरबार व शिर्डीमध्ये तर भाजपतील बंडखोर अपक्ष म्हणून उभे ठाकले होते. त्याचाही फायदा विरोधकांना उठवता आला नाही. कारण यंदा मोदी लाट नसल्याचा आडाखा बांधून विरोधक गाफिल राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेले मतविभाजन सत्ताधाऱ्यांच्या उपयोगी पडले असे म्हणावे, तर मग ‘मनसे फॅक्टर’ आघाडीच्या उपयोगी पडू का शकला नाही? धुळ्यातील मालेगावच्या पारंपरिक मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित गेले असते तर, आघाडीसाठी ते लाभाचे ठरले असते. दिंडोरीतील येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्वत: भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज आमदारकी भूषवित असतानाही तेथे राष्ट्रवादीला मताधिक्य मिळू शकले नाही. नगरची जागा तर राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली. त्यामुळे डॉ. सुजय विखे भाजपच्या वाटेवर गेले, पण तरी संग्राम जगताप सुमारे पावणेतीन लाखांपेक्षा अधिकच्या फरकाने पराभूत झाले. यातून काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारल्याचे दिसते.