बुलडाणा: आश्रमांमधील अनाथ मुलांच्या आजीवन पुनर्वसनाची जबाबदारी सरकार स्वीकारत नाही, तोपर्यंत या मुलांचे भविष्य सुरक्षित नाही. अंध, अपंग, मूक-बधिर मुला-मुलींना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही अनाथ आश्रमात ठेवले जात नाही. त्यांना बाहेर काढले जाते. जे विकलांग आहेत, असहाय्य आहेत, अनाथ आहेत, बेवारस आहेत, अशा मुलांना १८ वर्षांनंतर सुरक्षितता नसेल तर त्यांचे भविष्य अंध:कारमय आहे. एकटा शंकरबाबा यासाठी भांडतो, अजून किती दिवस भांडायचे, असा सवाल उपस्थित करीत कायदा करा, नाही तर हजारो मुले-मुली वाममार्गाला लागतील, असा इशारा समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी दिला. सोमवारी ह्यलोकमतह्ण कार्यालयास भेट देऊन त्यांनी संवाद साधला. यावेळी अपंगांच्या पुनर्वसन प्रश्नावर शंकरबाबा आक्रमक झाले होते.प्रश्न : असा कायदा नसल्यामुळे सामाजिक प्रश्न उभा राहू शकतो का ?-अर्थातच! अपंगांचा वाली कोण? समाजात अपंगांची संख्या खूप मोठी आहे. १८ वर्षे या अंध, अपंग, मूक-बधिर व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या सर्व मुला-मुलींना सांभाळायचे, त्यांना वळण लावायचे अन् वयाची अट पूर्ण झाली की बाहेर काढायचे? त्यांचे रक्षण कोण करणार? दरवर्षी साधारणपणे एक लाख अपंगांना असे बेवारस जिणे जगावे लागते, हा सामाजिक प्रश्नच तर आहे. प्रश्न : या कायद्याबाबत तुमची लढाई आणखी किती दिवस ?-सरकारने ठरविले तर एका बैठकीत याबाबत वटहुकूम निघून कायदा होऊ शकतो. माझी लढाई सतत सुरु आहे. मी हा प्रश्न मरेपर्यंत सोडणार नाही, मिळेल त्या व्यासपीठावरून मी हा प्रश्न लावून धरत आहे. त्यामुळे आज ना उद्या नक्कीच यश येईल. शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे का ?-हो, नक्कीच आहे. अनेक आमदार व खासदारांनी हा प्रश्न लावून धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचाही रेटा आहे. अपंगांच्या प्रश्नांचे गांभीर्य आता तरी सर्वांच्या लक्षात आले असेल. त्यामुळे या कायद्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा नक्कीच आहे.प्रश्न :ह्यवझ्झर पॅटर्नह्ण ला लोकांचा प्रतिसाद कसा आहे?-रस्त्यावर फेकून दिलेल्या मुला-मुलींना मी सांभाळले, त्यांना वळण लावले. आता या मुलींच्या लग्नात सारा समाज मदत करतो, आपली मुलगी म्हणून तिला मान देतो. तुमच्या राधेश्याम चांडक यांच्यासारखे शब्दाला जागणारे लोक पाठीशी उभे राहतात. हे सर्व लोकांच्या विश्वासामुळेच आहे. तुम्ही याला वझ्झर पॅटर्न म्हणा. मी माझे घर म्हणतो. प्रश्न : वझ्झर कसे आहे ?-वझ्झर हे अंध, अपंग, मूक-बधिर, अनाथ मुला-मुलींचे घर आहे. या घरामध्ये ९८ मुली व २५ मुले राहतात. या सर्वांना आधार कार्ड दिले आहे. या कार्डवर त्यांच्या नावामागे बाप म्हणून शंकरबाबा पापळकर हे नाव लिहिलेले आहे. हे केवळ कागदोपत्री नाव नाही, तर बाप म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो. आतापर्यंत अपंग मुलींची लग्न लावली. त्यांचे संसार सुखाचे आहेत.
आजीवन पुनर्वसनाचा कायदा करणार तरी कधी?
By admin | Updated: January 5, 2016 01:50 IST