शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वारीचा नेमका अर्थ काय?

By admin | Updated: June 27, 2016 19:29 IST

ज्ञानेश्र्वरीत कुठेच प्रचलित अर्थाने वारी शब्द आलेला नाही. किंवा त्यांच्या नावाने सुरू असलेली वारी पंढरपूरला जात असली तरी उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ‘विठ्ठला’चा कुठेही

- रमेश झवर 

ज्ञानेश्र्वरीत कुठेच प्रचलित अर्थाने वारी शब्द आलेला नाही. किंवा त्यांच्या नावाने सुरू असलेली वारी पंढरपूरला जात असली तरी उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ‘विठ्ठला’चा कुठेही नामोल्लेख ज्ञानेश्र्वरीत नाही. वारी शब्द दोन ठिकाणी आला आहे पण अलीकडे ‘वारी’चा जो अर्थ लोकांना माहित आहे तो अर्थ ज्ञानेश्र्वरांना अभिप्रेत नाही. ‘सरो कामक्रोधाची वारी’ असे एक चरण एका ठिकाणी आले आहे तर दुस-या ठिकाणी ‘सरो अहंकाराची वारी’ असे चरण आले आहे. वारी म्हणजे येरझारा असा अर्थ ज्ञानेश्वरीच्या शब्दकोशात दिला आहे. वारी म्हणजे वारा. जो येतो, जातो तो. येरझारा घालते तीच वारी! विठ्ठल हे महाराष्ट्राचे परम आराध्य दैवत असूनही सर्व संताच्या अभंगात हटकून सापडणारा विठ्ठल ज्ञानेश्र्वरीत नाही. ज्ञानेश्र्वरीत ग्रंथारंभी विठ्ठल स्मरण नाही. ज्ञानेश्र्वरीच्या सुरुवातीच्या ओव्यात स्मरण आहे ते गणपतीचे. ‘देवा तुचि गणेशु। सकलमती प्रकाशु।।‘ असे चरण आले आहे. इतकेच नव्हे, तर गणेशाच्या अवयवांना षडदर्शनापासून ते थेट बौध्द मतांपर्यंतच्या बहारदार उपमा ज्ञानेश्र्वरांनी दिल्या आहेत. अभंगांत मात्र ज्ञानेश्र्वरांनी ठिकठिकाणी विठ्ठलाच्या रूपादींची वर्णने केली आहेत. अमृतानुभवात आणि चांगदेव पासष्टीत मात्र विठ्ठलचा मागमूस नाही. ज्ञानेश्र्वरांच्या वाङ्मयातील ह्या अंतर्गत पुराव्याच्या आधारे 1930 ते 1940 च्या दशकात महाराष्ट्रात जोरदार वाद रंगला होता. योगी ज्ञानेश्र्वर वेगळे आणि भक्त ज्ञानेश्र्वर वेगळे असा ह्या वादाचा सारांश होता!

हा वादामुळे वारकरी मात्र मुळीच विचलित झाले नाहीत. वारीत ‘ज्ञानोबामाऊली तुकाराम’ हा गजर कायम आहे. वारीत अठरापगड जातींतील लोक सहभागी होत असले तरी ह्या गजरात फरक होत नाही. किर्तनातही ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम’ हाच गजर केला जातो. त्यात बदल नाही. किर्तनात जे अभंग म्हटले जातात त्यात फक्त ज्ञानेश्र्वर, नामदेव, तुकाराम आणि एकनाथ ह्यांचेच अभंग म्हणण्याचा अलिखित संकेत आहे. ह्या नियमात सहसा कुठेही फरक केला जात नाही. थोडक्यात, ज्ञानेश्र्वर हे वारकरी संप्रदायाचे जनक आहेत. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हा अभंग तर सर्वमान्य आहे. ज्ञानेश्र्वरांच्या घराण्यातही वारी होती. खानदेशातून संत मुक्ताईची वारी पंढरपूराला निघते. पैठणहून संत एकनाथाची वारी निघते. शेगावहून गजाननमहाराज संस्थानतर्फेही अलीकडे वारी पंढरपूरला निघते. खरे तर, वर्षांतून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ह्या चार एकादशीला निरनिराळ्या भागातून निघालेल्या वा-या पंढरपूरला पोहचतात. कोणतीही वारी करा, पुण्य सारखेच! सांगण्याचा उद्देश इतकाच की वारीची संकल्पना महाराष्ट्रात सर्वत्र सारखीच आहे.

वारीबद्दल वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊनही वारकरी संप्रदायाला वारीचा वेगळा अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. वारकरी संप्रदायातही गुरुशिष्य परंपरा असते. ह्या परंपरेतही ज्ञानेश्र्वरमाऊलींच्या नाथ संप्रदायातल्या प्रमाणेच अनुग्रह दिला जातो हे अनेकांना माहित नाही. वारीत सामील होण्याचाही ‘आदेश’ अनेक गुरू आपल्या संप्रदायातील शिष्यांना देतात. हा ‘आदेश’ देण्यापूर्वी शिष्याला वारीचा अर्थ विषद केला जातो. वारी ह्याचा अर्थ नाकापासून फुफ्फुसापर्यंतच्या ‘बारा अंगुळे’ अंतराच्या श्वास मार्गात चालणारा श्वासोश्वास! ह्या श्वासोश्वासावर लक्ष ठेवणे हीच खरीखुरी ‘वारी’. संत एकनाथांच्या ‘वारियाने कुंडल हाले डोले मोडित राधा चाले’ ह्या गवळणीचा गूढ अर्थदेखील हाच आहे. नासारंध्रातून अहर्निश येरझारा घालणारा वारा! ह्या वारियानेच कुंडल हलते. म्हणजे कुंडलिनी शक्ती हलते. हलते म्हणजे योगशास्त्रानुसार तिचा वरच्या दिशेने प्रवास सुरू होतो. कंडलीचा हा प्रवास ब्रम्हरंध्रापर्यंत अपेक्षित असला तरी कोणताही गुरू आपल्या शिष्याला कुंडलीचा तिथपर्यंतचा प्रवास करू देत नाही. जास्तीत जास्त तो आज्ञाचक्रापर्यंतच करू दिला जातो; त्यापुढे मात्र नाही. कारण, कुंडलीचा पुढचा प्रवास जीवावर बेतण्याचा संभव असतो. म्हणूनच विष्णूचे स्थान असलेल्या ह्रदयाकाशापर्यंतच हा प्रवास नेण्याची शिष्याला गुरूची संमती असते. ‘भक्त व्हा’ असा ह्या आदेशाचा आणखी एक अर्थ!

ज्ञानेश्र्वरांच्या मते, ‘भक्त तोचि योगी’. भक्त आणि योगी ह्यात ज्ञानेश्र्वरमाऊली फरक करत नाही. म्हणूनच वारीत सहभागी होणारे भक्त हे योगीदेखील आहेत. अशा त-हेने ज्ञानेश्र्वरांनी नाथ संप्रदायातील गुरूकडून प्राप्त झालेले श्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या योगदीक्षेस सोपे वळण लावले. गुरूकृपेने प्राप्त होणारे हे रहस्य वारीत सहभागी होणा-या अनेक नवशागवशांना हे माहित नसते. अर्थात ते माहित नसले तरी फारसे बिघडत नाही. माणूस ज्ञानी किंवा अज्ञानी असो, त्याची श्वासोश्वासाची प्रक्रिया निरंतर चालू राहणारच. ती चालू असते म्हणूनच त्याचे जीवन शांत नदीसारखे वाहत राहते. पाय पंढरीची वाट चालतात. पण तो चालत नाही. कर्ता-करविता तर ‘तो’ आहे. त्याला थकवा येण्याचा प्रश्नच नाही. दोन वेळचे जेवण, चहा आणि मधल्या वेळचे खाणे ह्यापेक्षा त्याला कशाचीही अपेक्षा नाही. आपले जीवन हीच एक वारी आहे! अपेक्षा नाहीत म्हणून अपेक्षांचे ओझेही नाही. शिष्यभावाने वारीत सामील झालेल्यांनाच वारीचा अर्थ उमगतो. गुरुपदिष्ट विद्या चव्हाट्यावर बोंबलून सांगायची नसते, असा संकेत ज्ञानोबामाऊलींनी एका ओवीत नमूद केला आहे. म्हणून वारीचे वर वर निरीक्षण करण्यास आलेल्या नवशागवशांना हा गूढ अर्थ समजण्याचा संभव जरा कमीच आहे.

आता विठ्ठलच का? कारण, चोविसावेगळा अवतार असला तरी विठ्ठल हा विष्णूचाच अवतार! योगी ध्यान करतात. पण कोणाचे? विष्णूचे. कारण, ‘योगिभीः ध्यानगम्यम्’ असा मुळी एक श्लोक असून तो गीतेच्या आरंभीच्या पानावर छापलेला आहे. स्वतः ज्ञानेश्र्वर तर महाविष्णूचे अवतार मानले जातात. तुकारामाच्या अभंगातही विष्णूचा स्पष्ट उल्लेख अनेक वेळा आला आहे. विष्णूमूर्ती सामान्यतः चार हातांची असते. पंढरपूरचा विठ्ठल जरी विष्णूचा अवतार असला तरी त्याला दोन हात आहेत. तो निःशस्त्र आहे. त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. तरीही त्याच्या एका हातात कमळ आहे तर दुस-या हातात शंख आहे. विष्णूच विठ्ठलरूपाने उभा असला तरी ह्या ठिकाणी तो योध्दा नाही. तो आहे ‘योगीराणा’! देशभरात योगसाधना करणारा असा एकही योगी नसेल की ज्याने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. समर्थ रामदासांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीत साक्षात् कोदंडधारी रामाचेच दर्शन झाले. भक्ती आणि योग हे दोन मार्ग वेगऴे नाहीत ही ज्ञानोश्वरांची उक्ती तसे पाहिले तर निखळ सत्यदर्शनच आहे ह्याला आणखी कोणता पुरावा द्यायला हवा?

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )