दुर्गापूर (चंद्रपूर) : दुर्गापूर वेकोलीच्या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीला लग्नाकरिता नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने त्याच्याच घरावर चढून पाच तास ‘वीरूगिरी’ केली. एका समाजसेविकेच्या मध्यस्थीने तिला कसेबसे खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले, तर तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. दुर्गापूर येथील जावेद गफ्फार देशमुख या युवकाचे परिसरातील युवतीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, मध्यंतरी ते लग्न करण्याच्या उद्देशाने पळूनदेखील गेले होते. मात्र त्यावेळी युवती अल्पवयीन असल्याने जावेदला अटकसुद्धा केली होती. या घटनेनंतरही मुलीने त्याचेकडे लग्नासाठी अट्टाहास धरला. त्याला मुलाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी सकाळी तिने प्रियकराचे घर गाठले. मात्र तेथेही प्रतिसाद न मिळाल्याने ती त्याच्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर चढली. (प्रतिनिधी)
प्रेयसीची ‘वीरूगिरी’
By admin | Updated: August 26, 2015 01:19 IST