पनवेल : शासनाच्या विविध महामंडळांच्या वेतन व भत्त्यांची महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घेतली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांचे दायित्व शासनाने घ्यावे, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध राज्यस्तरीय ११ संघटनांच्या संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता देवेंद्र लांडगे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवीन पनवेल या कार्यालयाच्या परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, नवीन पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनभत्ते व निवृत्ती वेतन यांचे दायित्व शासनाने स्वीकारण्यासंबंधी मागील चार वर्षांपासून संघर्ष चालू आहे. त्याचाच भाग म्हणून १ मार्च, २०१७पासून प्रथम पाच दिवस काळ्या फिती लावून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व कर्मचारी काम करणार आहेत. शासनाने जर वेळीस दखल घेतली नाही, तर ६ मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. वेळेवर वेतन मिळणे, निवृत्ती वेतन मिळणे, डीए मिळणे, अशा मागण्यांसाठी अंदोलन करणार आहे. यात एमजेपीचे ६ हजार कर्मचारी व ९ हजार निवृत्त कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती देवेंद्र लांडगे यांनी दिली. (वार्ताहर)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: March 2, 2017 02:51 IST