डिप्पी वांकाणी, मुंबईगँगस्टर रवी पुजारी याची पत्नी समजून दुसऱ्याच महिलेला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर घडली. दरम्यान, ही महिला संतोष नावाच्या व्यावसायिकाची पत्नी असून, तिच्या आणि मुलाच्या नावातील साधर्म्यामुळे गफलत झाल्याचे समजते. बोरिवली येथील श्रीदेवी संतोष पुजारी व तिचा १४ वर्षांचा मुलगा आर्यन हे सोमवारी सायंकाळी विमानाने दुबईला निघाले होते. त्यावेळी त्यांना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तपासणीदरम्यान थांबवले. कर्नाटकातील मंगळुरू येथील पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याविरुद्ध मंगळुरू येथे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद होता. हे समजताच मुंबई पोलिसांच्या युनिट ९ चे एक पथक इन्स्पेक्टर मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली विमानतळावर हजर झाले आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र खेतले यांना खात्री होती की संबंधित महिला रवी पुजारीची पत्नी नसावी़ कारण त्यांनी रवी पुजारीच्या पत्नीची पद्मा या नावाने खोटा पासपोर्ट बनवण्याच्या प्रकरणी चौकशी केली होती. दरम्यान, मंगळुरू पोलिसांकडून खातरजमा करण्यासाठी संपर्क साधला गेला आणि त्यांनी एक फॅक्स पाठवून त्यांना थांबवून ठेवण्यास सांगितले. तसेच आपले एक पथक पाठवत असल्याचे सांगून ते पोहोचेपर्यत थांबण्यास सांगितले. मात्र एखाद्या व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात ठेवता येत नसल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तोवर मंगळुरू पोलिसांचे पथकही दाखल झाले. आता त्यांच्या कडून खातरजमा केली जाईल.
रवी पुजारीची पत्नी समजून दुसऱ्याच महिलेला घेतले ताब्यात
By admin | Updated: December 24, 2014 02:31 IST