मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री दर्जाचे अशी दोन मंत्रिपदे देण्याची तयारी भाजपाने दाखवली असल्याचे समजते. त्यामुळे आता महाराष्ट्रातील भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेण्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांना शपथ द्यावी, ही शिवसेनेची आग्रही भूमिका काहीशी मवाळ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सायंकाळी दूरध्वनी करून शिवसेनेकडून मंत्रिपदाकरिता दोन नावे सुचवण्याची विनंती केली. शिवसेनेचे अनंत गीते हे सध्या केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून, त्यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम ही खाती आहेत. याखेरीज आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्रिपद शिवसेनेला मिळेल. येत्या रविवारी ९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने विश्वासदर्शक ठरावाकरिता सोमवार, १० नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यापूर्वी शिवसेनेचा मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. गुरुवारी शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीतही ‘अगोदर राज्य मंत्रिमंडळात सहभाग आणि मगच विश्वासदर्शक ठरावाकरिता सहकार्य’ अशी भूमिका शिवसेनेने घेतली. मात्र आता भाजपाने केंद्रात शिवसेनेला मंत्रिपदे देऊ केल्याने देवेंद्र फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी राज्यातही शिवसेनेचे मंत्री करण्याचा आग्रह शिवसेना तूर्त बाजूला ठेवील, असे संकेत मिळत आहेत. शिवसेना विरोधी पक्षात बसण्याची शक्यताही शिवसेनेला केंद्रात मिळणाऱ्या मंत्रिपदामुळे मावळली आहे.
सेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे
By admin | Updated: November 7, 2014 05:08 IST