- अक्षय चोरगे मुंबई : देवीच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे, माटुंगा येथील श्रीमनमाला देवी मंदिर. दोनशे वर्षांपूर्वी स्थानिक शिवाजी सावंत यांनी हे मंदिर बांधले. मंदिर असलेल्या परिसरात दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी, सध्याच्या माटुंगा ब्रिजपासून ते स्टार सिटी सिनेमापर्यंत पसरलेले मोठे तळे होते, या तळ्याचे नाव ‘मनमाला’ असल्याने, देवीचे नावही ‘मनमाला’ पडल्याचे स्थानिक सांगतात. वेगवेगळ्या सात देवींच्या मूर्ती मंदिरात असल्याने, ‘सात आसरा मनमाला देवी’ असेही म्हटले जाते.मंदिर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस जय-विजय असे द्वारपाल आहेत. मंदिरात प्रवेश करताच, डाव्या बाजूला एक प्राचीन विहीर आहे. विहिरीच्या बाजूला एका उंचवट्यावर देवीचा मुखवटा आहे. त्यास ‘गावदेवी’ असे म्हटले जाते. जरा पुढे गेल्यावर देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या गाभाºयात एका उंचवट्यावर देवीच्या सात स्वयंभू दगडी मूर्तींसह कृष्ण आणि गणपतीची मूर्ती आहे.मूर्तींमध्ये गणपती, संतोषीमाता, राखणदार कान्हू गवळी (कृष्ण-देवीचा भाऊ), चंपावती देवी, केवडावती देवी, मनमाला देवी, जरीमरी देवी, शितळा देवी आणि खोकला देवी अशा क्रमाने देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराशेजारी शिवलिंग आणि मारुती मंदिर आहे.मंदिरात दर मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दी असते. मंदिरात चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव साजरे केले जातात. चैत्र महिन्यात साध्या पद्धतीने उत्सव होतो. मंदिरात साजरा होणारा अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव आसपासच्या परिसरात प्रसिद्ध आहे.
दोनशे वर्षे पुरातन मनमाला देवी मंदिर, देवीच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:34 IST