भारत चव्हाण -कोल्हापूर -महानगरपालिकेने आपल्या प्राथमिक शाळांना महान व्यक्तींची, समाजधुरिणांची, क्रांतिकारकांची नावे देऊन संस्कार घडविणाऱ्या या शाळा महान व्यक्तींचे स्मारक म्हणूनच उभ्या केल्या; परंतु शाळा बंद पडल्यावर इमारतीच्या माध्यमातून उभी असलेली ही स्मारके उद्ध्वस्त झाली आहेत. बंद शाळा या जनावरांचे गोठे, भटक्या जनावरांचे, व्यक्तींचे आश्रयस्थान आणि मद्यपी व जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. अक्षरश: करोडो रुपयांच्या या इमारतींना अवकळा आली आहे; परंतु याचे शल्य ना महापालिकेला आहे ना परिसरातील नागरिकांना! विद्यार्थ्यांच्या पुरेशा पटसंख्येअभावी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने दोन वर्षांपूर्वी शहरातील सात शाळा बंद केल्या आहेत, तर यंदाच्या (२०१४-२०१५) शैक्षणिक वर्षापासून पाच शाळा बंद केल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजाराम महाराज, अण्णा भाऊ साठे, पंडित जवाहरलाल नेहरू, महाराणी ताराबाई, रमाबाई आंबेडकर, छत्रपती पद्माराजे, छत्रपती विजयमाला, न्यायमूर्ती रानडे, रंगराव साळुंखे, अशा मान्यवरांची नावे शाळांना दिली. राजारामपुरीतील अण्णा भाऊ साठे विद्यालयाची इमारत जनावरांचा गोठा म्हणून वापरली जात आहे. आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या शेळा-मेंढ्या या इमारतीत बांधल्या जातात. शाळेच्या आवारात शेळ्यांच्या लेंढ्या व मुत्राने दुर्गंधी पसरलेली असते. शाळा इमारत मात्र भकास झाली आहे. कारण शाळेत यायला विद्यार्थीच नाहीत. राजारामपुरीसारख्या महागड्या परिसरात छत्रपती राजाराम विद्यालय व छत्रपती विजयमाला कन्या विद्यामंदिरची इमारतही अशाच बेवारस पडलेल्या आहेत. राजाराम विद्यामंदिर आवार आता भटकी कुत्री, जनावरे आणि दिवसाही ‘नशेत टाईट’ असणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. या शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींचे ग्रुप बसलेले असतात. रस्सा मंडळाच्या पार्ट्या सुरू असतात. जून महिन्यापासून या शाळेत उर्दू मराठी स्कूल ही शाळा भरविण्यात येत आहे. परंतु या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सकाळी पहिले दोन तास परिसर स्वच्छ करण्यात जातात. छत्रपती विजयमाला कन्या शाळेभोवतीचा परिसर हा पार्किंगचा अड्डा बनला असून, शाळेच्या भिंती म्हणजे मुतारीचा आडोसा म्हणून नागरिक त्याचा वापर करतात. मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालय (मुले) या शाळेचीही दुरवस्था दिसून येते. या शाळेच्या खिडक्या, दरवाजे तोडले गेले आहेत. रात्रीच्यावेळी अनैतिक प्रकार येथे चालतात. वारसदारांनीच पुसले वडिलांचे नाव शार्दुल भाऊसाहेब पाटील विद्यालय नावाची एक शाळा महापालिकेने चालविली होती; परंतु विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत काही कारभाऱ्यांनी ही शाळा बंद केली. वर वर पटसंख्येचे कारण दाखविले गेले असले तरी शाळेची असलेली मौल्यवान जागाच खरे कारण होते. कारभाऱ्यांनी ही शाळा बंद करताना आंबा पाडला; परंतु ज्यांचे नाव शाळेला देण्यात आले होते, त्यांच्या वारसदारांनीही त्यात हस्तक्षेप केला नाही. शाळा बंद का करताय म्हणून जाब विचारला नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने सुरू झालेली शाळा आता बंद झाली, पण शाळा पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे; परंतु स्थानिक राजकारणामुळे ही शाळा सुरू होणे रखडले आहे. याच शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आहेत. - कुमार दाभाडेमहापालिकेच्या शाळा म्हणजे थोर माणसांची जिवंत स्मारकेच होती. आता शाळा बंद केल्यामुळे नव्या पिढीला या थोर माणसांबद्दल कसे कळणार? त्यांचा आदर्श कसा घेता येईल. गोरगरीब मुलांच्या शाळांचे अस्तित्व टिकविले पाहिजे.- निर्मला निंबाळकर शाळेत पहारेकरीच नाहीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वच शाळेत रात्रीच्या वेळी पहारेकरी नाहीत. त्यामुळे या शाळा म्हणजे मद्यपी, जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. प्राथमिक शिक्षण मंडळाने आपल्या शाळांची रखवालदारी करण्याकरिता ६० कामाठी पहारेकरी नेमले होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत ‘कशाला पाहिजेत शाळा राखायला वॉचमन’ अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुज्या मानसिकतेतून हे कामाठी वॉचमन महापालिकेने वेगवेगळ्या विभागात वसुलीसाठी नेमून घेतले आहेत. त्यामुळे शाळांचे पावित्र्य मात्र रात्रीच्या अनैतिक गोष्टींमुळे नष्ट झाले आहे. शिवाय लोखंडी साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे.दोन वर्षांपासून बंद पडलेल्या शाळा अण्णा भाऊ साठे विद्यालयरंगराव साळुंखे विद्यालय महाराणी ताराबाई वि. (मुले)मुलींची शाळा क्रमांक ५ पद्माराजे विद्यालय (मुले)पद्माराजे विद्यालय (मुली)नेहरू कन्या विद्यामंदिर
पटसंख्येअभावी बारा शाळा बंद
By admin | Updated: December 2, 2014 00:20 IST