नवी दिल्ली : भाजपा नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी, सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले आहे. मुंडे विद्यार्थी असताना संघाचे स्वयंसेवक झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य करीत असताना ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले. त्यांचे आकस्मिक निधन आम्हा सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आणि दु:खद घटना आहे, असे त्यात म्हटले आहे. आपल्या आक्रमक नेतृत्वामुळे मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवले आणि सामान्य जनतेकडून लोकप्रियता मिळवली. त्यांच्या कौशल्याच्या बळावर त्यांच्याकडे अखिल भारतीय जबाबदारी आली होती. ही जबाबदारी पार पाडताना आपल्या नेतृत्वकौशल्याचा आणि कतृर्त्वाचा नवीन कीर्तीमान नोंदवतील, असे आम्हाला वाटत होते. परंतु नियतीची योजना निष्ठूर आणि अनाकलनीय आहे. त्याचा दु:खद प्रत्यय आम्हाला येत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. आम्ही त्यांच्या शोकाकूल कुटुंबीयांच्या सोबत आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि या धक्क्यातून सावरण्याचे बळ त्यांच्या शोकाकूल कुटुंबाला आणि आम्हा सर्वांना मिळो, या प्रार्थनेसह संघाच्यावतीने आम्ही दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतो, असे संघाने शोकसंदेशात म्हटले आहे.(विशेष प्रतिनिधी)
मुंडेंना संघाची श्रद्धांजली
By admin | Updated: June 4, 2014 00:30 IST