कार्लेखिंड/ पेण : मागच्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राज्य सरकारकडून दखल घेत हा मार्ग व्यवस्थित प्रवास करण्यायोग्य करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू होते. तसेच मार्गाचे काम सुस्थितीत करण्यात आले होते. त्यासाठी पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा पाहणी दौरा सुध्दा झाला होता. परंतु या मार्गावर पडत्या पावसामध्ये डांबरीकरण व काही टप्प्यात पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा जैसे थे झाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळपासूनच तरणखोप,पेण ते वडखळ या दरम्यान प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. गणेशोत्सवाच्या दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्यामुळे प्रवाशांना वाटले होते की, आता वडखळ-पेण हा प्रवास सुखाचा होईल. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून पावसाचे जोरदार हजेरी लावली आणि रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली. त्यामुळे तरणखोप,पेण ते वडखळ भागात सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. निव्वळ मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कर्मचारीवर्ग, शाळकरी विद्यार्थी आणि रु ग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्या होत्या. (वार्ताहर)
गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
By admin | Updated: September 20, 2016 03:20 IST