मुंबई : तब्बल सव्वा कोटीचा हिरा हिसकावून पळ काढणाऱ्या चौघांना व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने गजाआड केले. तसेच हा हिराही हस्तगत केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे व्यापारी संजीव अवस्थी यांचा हा हिरा होता. आर्थिक चणचण असल्याने त्यांनी तो विकण्यास काढला. यासाठी अवस्थी यांनी विरारचे व्यापारी ग्यानप्रकाश गौड यांच्याशी संपर्क साधला. हिरे दलाल सतीश मिश्रा याने या हिऱ्यासाठी ग्राहक आणले. २६ जून रोजी गौड हिऱ्याच्या व्यवहारासाठी गिरगावच्या मथुरा भोजनालय येथे आले. तेथे मिश्रासह अन्य तीन तरुण उपस्थित होते. मिश्राने त्यांची ओळख हिरे व्यापारी म्हणून करून दिली. या तिघांनी गौड यांना हिरा दाखवण्यास सांगितले. गौड यांनी हिरा बाहेर काढताच या तिघांनी तो हिसकावला, गौड यांच्या हातावर चाकूचे वार केले आणि तेथून धूम ठोकली.हे प्रकरण व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात पोहोचताच वरिष्ठ निरीक्षक सुरेश किलजे यांच्या मार्गदर्शनाखालील निरीक्षक संजय कांबळे, सुरेश म्हस्के, फौजदार राजू सुर्वे आणि पथकाने तत्काळ हालचाल करून मिश्राला गजाआड केले. पुढील तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शरद पाबरेकर, नीलेश नांदगावकर, शंकर महादेव काजारे या तिघांना ताब्यात घेतले आणि व्ही. पी. रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. मिश्राने या तिघांना ग्राहक म्हणून गौड यांच्यासमोर आणले होते. यापैकी पाबरेकर याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून कोट्यवधींचा हिरा हस्तगत केला.
चोरांकडून सव्वा कोटीचा हिरा हस्तगत
By admin | Updated: July 5, 2014 04:46 IST