पुणे : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांनी पुकारलेला संप आज स्थगित केला. डॉक्टरांच्या ३ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून १० दिवसात त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदंत संप आज मागे घेतला. त्याचबरोबर आजपासून वर्ग १ मधील वैद्यकीय अधिकार्यांनी पुकारलेला संपही स्थगित करण्यात आला आहे.सहावा वेतन आयोग लागू करावा, केंद्र सरकार व वैद्यकीय शिक्षण खात्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना उच्च वेतन मिळावे, अस्थायी ७८९, बीएएमसीसी वैद्यकीय अधिकारी गट ब, अस्थायी ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकार्यांचे सेवा समावेशन करावे आदी मागण्या राज्यभरातील डॉक्टरांकडून करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांसोबत डॉक्टर संघटनेची बैठक झाली होती. मात्र तेथे त्या फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे ३ जूनपासून राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याच्या मार्गावर पोहोचली होती. त्यामुळे आज आरोग्य विभागाने तातडीने बैठक घेऊन मागण्या मान्य केल्या.
शासकीय डॉक्टरांचा संप स्थगित
By admin | Updated: June 5, 2014 22:52 IST