मुख्यमंत्र्यांकडून लवकरच समितीची घोषणा नागपूर : नागपूरसह विदर्भाचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ‘टेक आॅफ’ घेणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवून, प्रकल्पाला चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे गडकरींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या समितीची घोषणा करणार आहेत.मिहान प्रकल्पासाठी गडकरी सुरुवातीपासूनच ‘सिरियस’ आहेत. या प्रकल्पात विविध उद्योगांनी यावे यासाठी वेळोवेळी गडकरी यांनी पुढाकार घेत उद्योजकांशी चर्चा देखील केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर विदर्भ विकासाचा ‘रोड मॅप’ आखताना मिहानला चालना देण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता मुख्यमंत्री फडणवीस हे मिहानसाठी गडकरींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याने गडकरी- फडणवीस समन्वयातून मिहान भरारी घेईल, अशी आशा बळावली आहे.शासनातर्फे नेमण्यात येणाऱ्या या समितीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मिहान प्रकल्प येत असलेल्या हिंगणा मतदारसंघाचे आ. समीर मेघे यांच्यासह नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, नागपूर चेंबर आॅफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन यासह विविध उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. (प्रतिनिधी)समितीला उच्चाधिकारप्राप्त माहितीनुसार या समितीला उच्चाधिकार दिले जातील. धोरणात्मक निर्णय वगळता मिहान प्रकल्पाशी संबंधित बहुतांश निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असतील. या समितीच्या नियमित बैठका होतील. तीत प्रकल्पाची सद्यस्थिती, अडथळे व उपाय यावर चर्चा होईल. समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल. समिती मिहानबाबत शासनाला शिफारशीही करेल. ही समिती शासनाच्यावतीने मिहानसाठी ‘केअरटेकर’ प्रमाणे काम करेल.
गडकरींच्या नेतृत्वात मिहान घेणार ‘टेक आॅफ’
By admin | Updated: January 18, 2015 00:59 IST