ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १२ - नाशिक महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश आले असून महापौरपदावर मनसेचे अशोक मुर्तडक यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर मनसेने नाशिकमधील गड राखला असून शिवसेना - भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी नाशिकमध्ये महाआघाडीचा नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे.
नाशिक महानगरपालिकेत १४४ जागा असून अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मनसेला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या होत्या. ६२ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी मनसेने भाजपची साथ घेतली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपने मनसेशी काडीमोड घेत शिवसेनेशी युती केली. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचा पराभव होण्याची चिन्हे होती. राज्यातील एकमेव महापालिकेतील सत्ता कायम राहावी यासाठी मनसेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांशी चर्चा केली. या प्रयत्नांना यश आले व नाशिकमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांनी मनसेला पाठिंबा देत 'महाआघाडी' केली.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने मनसेला बाहेरुन पाठिंबा दिला. यामुळे शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना ४४ मतं मिळाली तर मनसेच्या अशोक मुर्तडक यांना तब्बल ७५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मनसेच्या बाजूने मतदान केले. तर १२२ पैकी तीन नगरसेवक मतदानप्रक्रियेत तटस्थ राहिले. महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड होताच मनसेकार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.