मुंबई : देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने प्रति मेट्रिक टन चार हजार रुपयांची सबसिडी देऊन १७ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपी एवढे पैसे द्यावेच लागतील, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.मागील वर्षी तयार झालेली ७० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून यंदा ३२० लाख मेट्रिक टन साखरेची निर्मिती होणार आहे. देशातील साखरेची गरज २५० लाख मेट्रिक टन एवढी आहे. त्यामुळे वर्षअखेर पुन्हा ८० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन साखरेची निर्यात व्हावी, याकरिता प्रति मेट्रिक टन ४ हजार रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे १७ लाख मेट्रिक टन साखर विदेशात विक्रीकरिता पाठवली जाईल. त्याचवेळी साखरेच्या आयातीला लगाम घालण्याकरिता आयात कर १० टक्क्यांवरून वाढवून २५ टक्के केलेला आहे. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली असून केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले असल्याचे दानवे यांनी सांगितले.
साखरेला चार हजार रुपयांची सबसिडी -दानवे
By admin | Updated: January 14, 2015 04:04 IST