राजेश भिसे, मुंबईदेशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहरी भागांत राहते़ कृषिप्रधान असलेल्या या देशात सध्या शेती किफायतशीर राहिली नाही़ परिणामी, ग्रामीण भागांतून रोजगाराच्या शोधात लोंढे शहरांकडे वळत आहेत़ लोंढे थोपविण्यासाठी ग्रामीण भागांतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे वा कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात शहरे अधिक बकाल आणि ग्रामीण भाग ओस पडण्याचीच शक्यता अधिक आहे़महानगरांप्रमाणेच इतर शहरांनाही वाढत्या लोकसंख्येची समस्या भेडसावत असून काळाची पावले ओळखून यावर उपाययोजना करणे अगत्याचे आहे़ राज्याचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरांतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ ़ एकूणच लोकसंख्या वाढीचा ताण हा प्रामुख्याने शहरांवरच असल्याचे दिसून येते़ लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी जन्मदर नियंत्रण, संतती नियमन शस्त्रक्रियांसारखे उपाय योजता येऊ शकतील़ लोकसंख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे़ गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विविध उपाययोजना आखून यावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले़ आगामी काही वर्षांमध्ये भारत हा तरुणांचा देश होणार असला तरी त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे अन्यथा, अवाढव्य लोकसंख्या असूनही उत्पादन श्रमशक्ती वाया जाऊन देश दिशाहीन होण्याची भीती अधिक आहे़ लोकसंख्येत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे़ आजमितीला राज्याची लोकसंख्या ११ कोटी ७३ लाख ५३ हजार ६३६ इतकी आहे़ देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही टक्केवारी ९़२९ इतकी आहे़ लोकसंख्या वाढीचा वेग जनजागृती, लोकशिक्षण आदींद्वारे कमी करता येऊ शकेल़ वाढती लोकसंख्या ही जागतिक स्तरावरील समस्या बनली असून याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगवरदेखील परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास आणि वाढत्या लोकसंख्येचा ताळमेळ भविष्यात बसणे मुश्कील होणार आहे़ तब्बल २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश एवढा प्रचंड भूविस्तार असलेल्या आणि जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशामध्ये आगामी काळात अनेक आव्हाने निर्माण होणार आहेत़ देशातील विविध महानगरांतील लोकसंख्या वाढीचा वेग पाहता याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे़ आगामी काळात जास्त लोकसंख्या असलेल्या भागांतून लोक कमी लोकसंख्या असलेल्या भागांत स्थलांतरित होतील़ सुदृढ अर्थव्यवस्था असलेला भाग मागास भागातील लोकांना आकर्षित करेल़ परिणामी, स्थानिक स्तरावर कार्बनडायआॅक्साइडच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढून याचा परिणाम जागतिक स्तरावर ऋतुचक्र बदलात होईल़ तसेच अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होणार होऊन असुरक्षितता निर्माण होईल़ त्याचप्रमाणे महानगरांमध्ये दाटीवाटीची वस्ती वाढण्याची शक्यता असून साथीचे आजार पसरून त्याचा प्रादुर्भाव जगभरात होण्याची भीती एका अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आली आहे़ अर्थव्यवस्थेवर याचा वाढता ताण, पर्यावरणाची अधोगती यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठीची क्षमता कमी होणे आदी परिणाम होण्याची शक्यता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
लोकसंख्या वाढीचा ताण शहरांवर
By admin | Updated: July 14, 2014 04:06 IST