नामदेव मोरे,
नवी मुंबई- मुंबर्ई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधील गांजा विक्री बंद झाली असली तरी अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. रोज किमान १०० किलो गुटखा या परिसरात व येथून शहरभर वितरीत केला जात आहे. पोलीस, एपीएमसी व अन्न व औषध प्रशासनाच्या वरदहस्तामुळे कष्टकरी कामगारांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात असून याची तक्रार आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. यापूर्वी बांगलादेशी नागरिकांसह संशयित अतिरेक्यांना मार्केटमधून अटक केली आहे. पण यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. गांजा माफिया टारझनने जवळपास २० वर्षे भाजी मार्केटमध्ये तळ ठोकला होता. याशिवाय तुंडा व पप्यासारखे गांजा विक्रेतेही बिनधास्तपणे मार्केटमध्ये वास्तव्य करू लागले होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर गांजा विक्री तात्पुरती थांबली आहे, पण गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन्ही मार्केटमध्ये जवळपास ७० पानटपऱ्या आहेत. याशिवाय प्रत्येक विंगमध्ये फिरून ३० पेक्षा जास्त परप्रांतीय गुटखा व पानसुपारी विक्री करत आहेत. दोन्ही मार्केटमध्ये पश्चिम बंगाल, बिहार व उत्तरप्रदेशमधून आलेले जवळपास अडीच हजार कामगार रोजंदारीवर काम करत आहेत. यामधील बहुतांश जणांना गुटख्याचे व्यसन लागले आहे. कष्टकरी कामगारांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात असून त्यांना जादा दराने गुटखा विकला जात आहे. बिनधास्तपणे हा व्यवसाय सुरू असताना त्यावर कोणीही कारवाई करत नाही. एपीएमसी प्रशासनाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत एकाही पानटपरीवर कारवाई करण्यात आलेली नाही. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत. कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाचे असल्यामुळे पोलीस फारसे लक्ष देत नाहीत. अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नवी मुंबईमध्ये नाही. ठाण्यामधून अधिकारी व कर्मचारी नवी मुंबईकडे येतच नाहीत. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. मार्केटमधील वैध व अवैध व्यापाराची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. प्रशासन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करते पण गुटखा विक्री करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली जात नाही. नियमाप्रमाणे ज्या पानटपऱ्यांमध्ये अशाप्रकारे अवैध व्यवसाय सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. परंतु एपीएमसीमध्ये अवैध व्यवसायामध्ये अनेकांचे हात गुंतलेले आहेत. अर्थमय हेतूमुळे कारवाई करायची कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रोज तब्बल १०० किलोपेक्षा जास्त गुटखा या परिसरात विकला जावू लागला असल्याने मार्केटमधील व्यापारी व नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. ७ ते ६० रूपयांना विक्री एपीएमसीच्या भाजी व फळ मार्केटमधील जवळपास ७० पानटपऱ्यांमध्ये गुटखा विक्री होत आहे. सर्व प्रकारचा गुटखा विक्रीला उपलब्ध आहे. विमल व गोवा ७ रूपये, रजनीगंधा दहा रूपये व आरएमडी माणिकचंद गुटख्यासाठी ५० ते ६० रूपये घेतले जात आहेत. बंदी असल्याने गुटखा जादा दराने विकला जात आहे. खुलेआम विक्री सुरू असूनही त्यावर कोणीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अनेक पानटपऱ्यांमध्ये अल्पवयीन मुले पानटपऱ्यांमध्ये काम करत असून खरेदी करण्यासाठी आलेल्या लहान मुलांनाही गुटखा दिला जात आहे. गुजरातवरून येतोय गुटखा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजरातमधून भाजीच्या गाड्यांमधून गुटखा विक्रीसाठी येत आहे. येथे आल्यानंतर तो मार्केटमधील सर्व पानटपऱ्यांमध्ये वितरीत केला जात आहे. नवी मुंबईतील इतर पानटपऱ्यांनाही एपीएमसीमधूनच पुरवठा केला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थमय तडजोडीचा संशय एपीएमसीमध्ये बिनधास्तपणे गुटखा विक्री होत असूनही आतापर्यंत एकाही पानटपरीवर कारवाई झालेली नाही. एपीएमसी प्रशासनाने पूर्णपणे अभय दिलेले आहे. अधिकारी व सुरक्षा विभागाचे कर्मचारी माहिती असूनही गप्प बसत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारीही या परिसरात फिरकत नसल्याने अर्थमय तडजोडी झाल्या आहेत का असा प्रश्न प्रामाणिक नागरिक विचारू लागले आहेत. गुप्ता बंधू बनले पुरवठादार भाजी मार्केटमध्ये व प्रवेशद्वारावर गुप्ता आडनावाच्या चार भावांचा दबदबा आहे. एपीएमसीमधील अनेक पानटपऱ्या त्यांनी चालविण्यास घेतल्या आहेत. गुजरातवरून गुटखा मागवून तो नवी मुंबईमध्ये पुरविण्याचे काम हे चारजण करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत.