मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याच्याविरुद्ध सीआयडीने आधीच गुन्हे दाखल केले असताना आता ‘मनी लाँड्रिंग’च्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. महामंडळाचे तब्बल १४७ कोटी रुपये अन्यत्र वळविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या महामंडळाचा २० महिने अध्यक्ष असताना त्याने महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेत केलेला भ्रष्टाचार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. महामंडळाची रक्कम त्याने आपल्या आणि सहकाऱ्यांच्या नावे असलेल्या कंपन्यांकडे वळती केली. या पैशांतून खरेदी केलेल्या संपत्तीवर ईडीकडून टाच येऊ शकते. चौकशीसाठी ईडीकडून कदमला लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. -----रमेश कदमने असे केले गैरव्यवहार...आधी सीआयडी व आता ईडी कदम याच्यावरील ज्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी करत आहे त्यातील काही ठळक गैरव्यवहार असे-ंस्वत: कदम अध्यक्ष असलेल्या बोरिवलीतील जोशाबा ग्राहक सहकारी संस्थेला ४१ कोटी रुपये महामंडळाकडून दिले.जोशाबा ग्राहक संस्थेला दिलेल्या ४१ कोटी रुपयांमधून १० कोटी रुपये हे संतोषी सिव्हील कंपनीला देण्यात आले. कुमराल कंपनीला ८ कोटी रुपये वाटले.५ कोटी रुपये कदमने स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात टाकले.१ कोटी ३० लाख रुपये हे तिरुपती एंटरप्रायजेसला दिले.७२ लाख रुपये स्टर्लिंग मोटर्स या फर्मला देण्यात आले. ७१ लाख रुपयांत येवला-नाशिक मार्गावर कदमने जमीन खरेदी केली. कदम याने बोरिवली येथे २ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला.बीड बायपास; औरंगाबाद येथे ११.५० कोटींची जमीन खरेदी केली.----औरंगाबाद येथील नियोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सहकारी सुतगिरणीला ५८ कोटी ६५ लाख रुपयांची खिरापत वाटली.मैत्री शुगर या केवळ कागदावर असलेल्या कंपनीला विनायक साखर कारखाना खरेदी करण्यासाठी ३० कोटी रुपये दिले.मोहोळ तालुक्यातील महालक्ष्मी सहकारी दूध संघाला बनावट बँक खाते तयार करून ५ कोटी ३३ लाख रुपये देण्यात आले. रमेश कदमने पेडररोडला भूखंड खरेदी केला. त्यासाठी हब टाऊन कंपनीची उपकंपनी असलेल्या कुमराल रिअॅलिटी इस्टेट प्रा.लि.कंपनीच्या नावावर हा ८०० चौरस मीटरचा भूखंड होता. रमेश कदम आणि त्याचा पीए विजय कसबे यांनी या कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी केले. त्यासाठी महामंडळाकडून तब्बल ९६ कोटी रुपये हब टाऊन आणि कुमराल कंपनीकडे वळते करण्यात आले. औरंगाबाद येथे युपीएससी/एमपीएससी मार्गदर्शन केंद्राकरता जमिनीची खरेदी करण्यासाठी ११ कोटी ४० लाख रुपये महामंडळाकडून कोहली या व्यक्तीला देण्यात आले. प्रत्यक्षात २ एकर जमीन ही कदमच्या नावावर खरेदी करण्यात आली. मैत्री शुगरला दिलेल्या ३० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये हब टाऊन कंपनीकडे वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत कमलाकर ताकवाले आणि गाडेकर या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या नावाने वळविण्यात आले. या शिवाय, महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली १४८ कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
कदम ‘ईडी’च्याही रडारवर
By admin | Updated: September 27, 2015 05:32 IST