‘नीरी’चा पुढाकार : वायुप्रदूषणावर राष्ट्रीय कार्यशाळेची सुरुवातनागपूर : प्रदूषणाची वाढती पातळी हा मानवजातीसमोरील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना वातावरणातील प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. त्यातही वायुप्रदूषणाचा सामना करण्याचे मोठे आव्हान विज्ञानासमोर आहे. आजचे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेता ‘नीरी’ने यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. वातावरणातील प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यासंदर्भात ‘नीरी’ने (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) विशेष ‘सॉफ्टवेअर’ निर्माण केले आहे. ‘एचएचआरए’ (ह्युमन हेल्थ रिस्क असेसमेन्ट) असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. ‘नीरी’तर्फे वायुप्रदूषणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान या ‘सॉफ्टवेअर’चे गुरुवारी तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. ‘नीरी’कडून सातत्याने वायुप्रदूषण आणि त्याच्याशी निगडित मुद्यांचा अभ्यास करण्यात येतो. याच अंतर्गत प्रदूषणाची वाढती पातळी व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास होणे आवश्यक आहे अशी जाणीव ‘नीरी’च्या वैज्ञानिकांना झाली व त्यातूनच या ‘सॉफ्टवेअर’ची संकल्पना सुचली. या सॉफ्टवेअरमुळे वायुप्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावरील परिणाम यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सोबतच वायुप्रदूषणातून भविष्यात निर्माण होणारे धोके व वातावरणातील याचे प्रमाण कमी करण्यासाठी कुठल्या उपाययोजनांची आवश्यकता आहे याच्या नियोजनासाठी देखील याचा उपयोग होऊ शकणार आहे. ‘नीरी’च्या वैज्ञानिकांच्या ‘टीम’ने सुमारे दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे ‘एचएचआरए सॉफ्टवेअर’ तयार केले आहे अशी माहिती राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन सचिव के.कृष्णमूर्ती यांनी दिली. गुरुवारी या ‘सॉफ्टवेअर’चे सादरीकरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणाच्या अभ्यासाचे ‘सॉफ्टवेअर’
By admin | Updated: August 7, 2014 01:04 IST