वाडा : ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोक्यातून अंधश्रद्धेचे हे भूत काही उतरण्याचे नाव घेत नाही. वाडा तालुक्यातल चिखले गावात लडकू वरठा यांची तलवारीच्या साहाय्याने वार करून नुकतीच हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले होते. गैरसमजातून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, वाडा पोलिसांनी या घटनेचा अखेर पर्दाफाश करीत चौघांना अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.चिखले वनपट्ट्यात राहणाऱ्या लडकू यांची ३१ मे रोजी हत्या झाली होती. त्यांच्यावर मारेकऱ्यांनी लोखंडी रॉड व तलवारीने वार केले होते. यात त्यांची पत्नी लाडकी व विवाहित मुलगी भारती या गंभीर जखमी झाल्या होत्या. वाडा पोलिसांनी या घटनेचा अत्यंत बारकाव्याने अभ्यास करून लडकू यांची बहीण श्यामला भुजड हिला ताब्यात घेतले. श्यामलाचा पती व मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तसेच श्यामला देखील सतत आजारी असते. यामुळे या दोघांच्या मृत्यूला व माझ्या आजारपणाला तिचा सावत्र भाऊ लडकू जबाबदार असल्याची सल तिच्या मनात होती. शिवाय सावरखांड येथील जमिनीवरून देखील या दोघांमध्ये वाद होता. यामुळे सूड भावनेने लडकूचा काटा काढायचा, असा तिने ठाम निश्चय केला. येथील एका महिलेकडे श्यामला उपचारासाठी जात होती. तिने लडकूचा काटा काढण्यासाठी वाडा तालुक्यातील गालतरे येथील काही ओळखीच्या मारेकऱ्यांची ओळख श्यामलाशी करून दिली व अखेर लडकूच्या हत्येचा कट शिजला. (प्रतिनिधी)
संशयातून बहिणीनेच केली भावाची हत्या
By admin | Updated: June 12, 2014 04:23 IST