मुंबई : कांदिवली सामूहिक बलात्काराला सध्या नवे वळण मिळाले आहे. चुलत आजोबांनीच पीडितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत ५८ वर्षांच्या चुलत आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.चारकोप परिसरात १४ वर्षांची नेहा आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी तिच्या पोटात दुखत असल्याने तिला कूपर रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर ती चार आठवड्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. नेहाने दिलेल्या जबाबानुसार, दीड महिन्यापूर्वी ती भाजी आणण्यासाठी बाहेर पडली असता दोन तरुणांनी तिला गुंगीचा वास देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानुसार चारकोप पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, एसीपी श्रीरंग नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय बाळशंकर यांच्या तपास पथकाने शोध सुरू केला. मुलगी घाबरली असल्याने तिच्याकडून माहिती काढणे पोलिसांना अवघड जात होते. अखेर तिला विश्वासात घेत पोलिसांनी तिच्याकडे अधिक विचारणा केली. तेव्हा तिने सांगितलेला घटनाक्रम खोटा असल्याचे समोर आले. यामागे तिचा चुलत आजोबाच असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. फेब्रुवारी महिन्यात ती बाहेर गेली असताना तिच्या आजोबांनी तिला वाटेत गाठले आणि जवळील निर्जन स्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्या भीतीने नेहाने कुणाला काहीच सांगितले नाही. त्यानंतर तिच्या आजोबाची तिच्या घरी ये - जा सुरू होती. त्यामुळे ती दडपणाखाली होती. त्यात आई-वडिलांना काही सांगितल्यास ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यात तुझीच बदनामी होणार असल्याचे सांगितल्याने नेहाने कुणालाच काही सांगितले नाही. (प्रतिनिधी)
चुलत आजोबांकडूनच लैंगिक अत्याचार
By admin | Updated: April 6, 2017 02:16 IST