- संजय पाठक, नाशिकशिक्षण विभागातील एका आदेशाने शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली असून, स्वत:च्या घराचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. संगणकीकरणाच्या नावाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक माहिती मागविताना शिक्षण खात्याने त्यांच्या घरांचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश यांची माहिती दोनच दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.गेल्या वर्षी चोक्कलिंगम शिक्षण आयुक्त झाल्यानंतर त्यांनी ‘यूएसएडी कोड’द्वारे मोबाइलमध्ये फोटो काढून विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती कळविण्याचा अजब फतवा काढला, त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, हे कोणास ठावुक नाही. तत्पूर्वी दोन शाळांमधील अंतर मोजण्यासाठी अॅँड्रॉइड फोनचा वापर करण्यासाठी मुख्याध्यापकांना सक्ती करण्यात आली होती. अँड्रॉइड फोन असणाऱ्यांनाच यासंदर्भातील प्रशिक्षणासाठी पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर ‘शालार्थ’ प्रणालीने गोंधळ घातला, तो मिटत नाही तोच आता ‘सरल’ नावाच्या आणखी एक प्रणालीने शाळांमध्ये खळबळ उडाली आहे.कोणतीही माहिती आॅनलाइन आणि तीसुद्धा सायबर कॅफे व्यावसायिकांच्या मदतीशिवायच भरण्याचा फतवा काढण्यात आला आहे. गुरुवारी ‘सरल’च्या माध्यमातून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांची माहिती संकलित करून देण्याच्या आदेशाने सारेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दैनंदिन काम सोडून आदेशाच्या अंमलबजावणीत गुंतले आहेत.कर्मचाऱ्याची व्यक्तिगत माहिती ठीक आहे; परंतु कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती- जन्मतारीख, उंची, वजन, प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, नोकरी करणारे- न करणारे, सदस्यांच्या शरीरावरील ओळख खुणा, वारसददार, घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश अशी सर्वच माहिती मागविण्यात आली आहे. प्रत्येकाचे आधार व मतदार ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागणार आहे. अनेक शिक्षक भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांनी घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वेतन अजून ‘आॅफ-लाइन’च...‘सरल’ प्रणालीचा वापर करून दरमहा १ तारखेलाच वेतन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून आॅफलाइनच आणि अनियमित वेतन मिळत आहे. गेल्या वर्षी पटसंख्या पूर्ण झाल्यानंतर आणि रोज आॅनलाइन पद्धतीने शासनाला पटसंख्या कळविली जात असताना, अद्यापही कर्मचाऱ्यांंना अर्धवेळ ठेवले आहे अनेकांचे वेतन वेळेत होत नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी रोज नवे फतवे निघत आहेत, अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
घरांचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी धावाधाव!
By admin | Updated: August 15, 2015 00:43 IST