मुंबई : भारतीय जनतेला विज्ञान आणि सत्याचे दर्शन करून देण्यासाठी २२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियानाच्या वतीने २४ डिसेंबर रोजी गोवंडी येथे भाग्य-आत्मा दहन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात भाग्य-आत्म्याच्या प्रतीकाचे दहन होईल.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो अनुयायांना धम्मदीक्षा देताना रुढी, परंपरा, आत्मा-ईश्वर, भाग्य, नशीब अशा भ्रामक कल्पनांची नाळ तोडून त्यांना विज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. तसेच हजारो वर्षांच्या धर्म व जातीच्या गुलामगिरीत जगणाऱ्यांना जागृत व मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. या दिनाच्या पूर्वसंध्येला बौद्ध, बहुजन समाजातील जनतेला भाग्य, नशीब, आत्मा, दैववाद आणि अंधश्रद्धा यापासून मुक्त करण्यासाठी २२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियानाच्या वतीने २0११पासून भाग्य आत्मा दहन उत्सव साजरा करण्यात येत आहे.यंदा २४ डिसेंबर रोजी शहीद अशोक कामटे मैदानाशेजारी, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडजवळ दुपारी ४ वाजता हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भाग्य-आत्म्याच्या प्रतीकात्मक प्रेताची अंत्ययात्रा काढून उपस्थित महिला त्यावर अग्निसंस्कार करणार आहेत.२0११पासून सुरू झालेले हे अभियान दिवसेंदिवस विस्तारत चालले असून, २४ डिसेंबर रोजी मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी भाग्य-आत्मा दहन उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे अभियानाच्या प्रचारक नीलम कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विज्ञान, क्रांतीसाठी बुधवारी भाग्य-आत्मा दहन उत्सव
By admin | Updated: December 23, 2014 02:47 IST