शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सातारच्या कॅमेरामननं केला ‘ख्वाडा’ पार!

By admin | Updated: October 24, 2015 23:56 IST

साध्या कॅमेऱ्याची कमाल : मेंढपाळांच्या जीवनावर आधारित चित्रपटात वीरधवलने भरले निसर्गाचे रंग

प्रदीप यादव ल्ल सातारा असं म्हटलं जातं की लेखक पटकथा लिहिताना त्याच्या मनात कथापट चित्ररूपानं सरकतो तर दिग्दर्शक ती कथा पडद्यावर दृश्यरूपात कशी मांडावी, याची दिशा ठरवतो; पण लेखक आणि दिग्दर्शकानं पाहिलेल्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याचं खरं कौशल्य असतं ते कॅमेरामनचं. कोणत्याही प्रकारचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान न वापरता एका साध्या एचडी कॅमेऱ्यातून पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध सोळा पुरस्कारांनी गौरविलेला ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट चित्रित करण्याचं शिवधनुष्य पेललंय साताऱ्यातील कॅमेरामन वीरधवल पाटील याने. नवख्या कलाकारांबरोबर काम करत असतानाही धनगरांच्या रखरखीत आयुष्यात अन् रांगड्या जीवनशैलीत आपल्या कॅमेऱ्यातून वास्तववादी निसर्गाचे रंग भरणाऱ्या वीरधवलने चित्रपटनिर्मितीतले अनुभव ‘लोकमत’जवळ दिलखुलासपणे व्यक्त केले. मेंढपाळाचं आयुष्य विंचवाच्या बिऱ्हाडासारखं. सगळ्या लवाजम्यासह मजलदरमजल करत रानोमाळ भटकायचं. दिवसभर मेढरं वळायची. रात्र होईल तिथं पाल टाकायचं. जमिनीला पाठ टेकवून आकाश पांघरायचं अन् उद्याचं स्वप्न रंगवत उजाड माळावर निजायचं, असे असंख्य खोडे हसत-हसत पार करत जीवन जगणाऱ्या मेंढपाळांच्या जीवनावर आधारित भाऊराव कऱ्हाडे या तरुणानं ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट बनविला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ख्वाडा’ या बहुचर्चित चित्रपटाचा कॅमेरामन म्हणून अनुभव कसा होता, याबद्दल विचारले असता वीरधवल म्हणाला, ‘मातीशी नातं सांगणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन बनविलेली ही एक रांगडी कलाकृती आहे. अभिनेता शशांक शेंडे आणि अनिल नगरकर हे दोन कलाकार सोडले तर सर्वच जण नवखे आहेत. ज्यांना अभिनय म्हणजे काय आणि कॅमेरा काय असतो, हे माहीत नाही अशा लोकांबरोबरच काम करताना अनंत अडचणी आल्या; पण अशा वेळी माझा पूर्वानुभव उपयोगी पडला. कलाकारांना जास्त सूचना देण्यापेक्षा कॅमेऱ्याचा अँगल बदलून दृश्ये चित्रित केली. ‘ख्वाडा’साठी उच्च तंत्रज्ञान वापरणेही गरजेचे नव्हते. कारण हा चित्रपट रांगडा आहे. रांगडेपण, त्यांच्या जगण्यातली वास्तवता चित्रित करताना नैसर्गिक वातावरणाचाच जास्त वापर करून घेतला.’  

फायटिंगचा सीन चांगलाच लक्षात! ‘ख्वाडा’मध्ये बहुंशी कलाकार नवखे आहेत; एवढेच काय पण घोडेसुध्दा रानटीच होते. फायटिंगचा सीन शूट करताना एका कलाकाराने कुऱ्हाडीचा वार थेट कॅमेऱ्याच्या तोंडावरच केला. कुऱ्हाड नकली होती म्हणून ‘सगळंच’ बचावलं. शूटिंग करताना घोडे सरळ कॅमेऱ्याच्या दिशेने धावत यायचे. अशावेळेला कॅमेरा सांभाळून दृश्य चित्रित करण्याची कसरत करावी लागे, असे वीरधवलने सांगितले.  

पुरस्कारप्राप्त कलाकृती साकारण्यात अनुभव कामी... चित्रीकरणासाठी किती किमतीचा किंवा किती उच्च दर्जाचा कॅमेरा वापरला हे महत्त्वाचे नसते. त्यामध्ये कौशल्य असते ते कॅमेरामनचे. ‘ख्वाडा’च्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. साध्या एचडी कॅमेऱ्याने हा चित्रपट चित्रित केला आहे. ‘हाय लाईट कंट्रोल’ होत नाही. त्यात ख्वाडाचे संपूर्ण चित्रीकरण ‘आऊटडोअर’ झाले आहे. माळरान, रखरखीत ऊन अशा वातावरणात चित्रीकरण करताना कॅमेऱ्यात जिथे जास्त प्रकाश दिसायचा त्या ठिकाणी एखादं मेंढरू नाहीतर घोडा उभा करून दृश्ये चित्रित केली आहेत. उपलब्ध साधनांचाच जास्त वापर केला आहे.  

अनेक चित्रपट, मालिकांसाठी सहायक कॅमेरामन म्हणून काम केलं. अत्याधुनिक कॅमेरे हाताळले. माझ्या नजरेतून साकारलेला ‘ख्वाडा’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. एवढी नितांत सुंदर कलाकृती आपल्या हातून निर्माण झाल्याचं खूप समाधान वाटतं. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविलं आहेतच; पण प्रेक्षकांची पसंती हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे मला वाटते. - वीरधवल पाटील, कॅमेरामन  

रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं! धनगरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात ‘कलरफुल सीन’ कसे असतील? त्यामुळे जे काही आहे ते फक्त नैसर्गिक. डोंगर, तलाव, मेंढपाळांचे रंगीत फेटे, मेंढ्यांचा तळ, पालं, रखरखीत ऊन, मोकळं आकाश अन् जत्रेतला गुलाल अन् भंडारा याचे चित्रण अशा प्रकारे केले आहे ज्यामुळेच हा चित्रपट अधिक जिवंत झाला आहे. यामध्ये कुठेही ‘मिक्सिंग’ केलेले नाही. रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं, असे वीरधवल म्हणाला.