दहीहांडा: नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्यांना विचारणा करणार्या दोघांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथून जवळच असलेल्या वडद बु. येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. वडद बु. येथील पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतानाही वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा सुरू आहे. उत्खननामुळे नदी पात्राची चाळणी झाली असून, नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे गावकर्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वडद बु. येथील विनोद कळसकर यांनी शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नदी पात्रात जाऊन वाळू माफियांना विचारणा केली असता त्यांनी कळसकर यांना फावडे, पाईप, सब्बलने मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कळसकर यांनी त्यांचा मित्र विशाल गोटूकले यांना भ्रमणध्वनीवरून हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या गोटूकले यांच्यावरही वाळू माफियांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात विशाल गोटूकलेही गंभीर जखमी झाले. नंतर दोघांनाही उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर दोघांनाही रविवारी दुपारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी वडद खुर्द येथील संजय भटकर व अन्य आठ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६०, १४३, १४५, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भास्कर तायडे पुढील तपास करीत आहेत.
वाळू माफियांचा दोघांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: June 15, 2014 21:56 IST