मोहन डावरे, पंढरपूरजाता पंढरीसी सुख वाटे जीवा। भेटतो तेव्हा नारायण।।या संत वचनाप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपुरासमीप आलेला संतांचा दळभार शेवटच्या मुक्कामासाठी वाखरीत दाखल झाला. बुधवारी बाजीराव विहिरीवरील सर्वांत मोठा रिंगण सोहळा संपल्यानंतर, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज या पालख्यांसह लहान-मोठ्या दिंड्या बाजीराव विहीर-वाखरी मार्गावर आल्या. आपण ‘पंढरीच्या उंबरठ्यावर’ असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी अनुक्रमे आळंदी व देहू येथून प्रस्थान केल्यानंतर, १५ दिवसांच्या प्रवासानंतर पालखी मार्गावरील शेवटच्या मुक्कामासाठी वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर विसावा घेतला. या पालख्यांसोबत असलेल्या शेकडो दिंड्या, त्यामधील लाखो भाविक वाखरी येथे दाखल झाले आहेत. यामुळे वाखरीला प्रतिपंढरपूरचे स्वरूप आले होते. वाखरी पालखी तळावर भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस, आरोग्य विभाग सज्ज होता. पालखी मार्गावर व वाखरीत आल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.नगर-पंढरपूर, कोल्हापूर-पंढरपूर, मंगळवेढा-पंढरपूर, कराड-पंढरपूर, सोलापूर-पंढरपूर आदी मार्गांवरून पंढरपुरात दाखल होत असलेल्या विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरात आल्यानंतर, परंपरेप्रमाणे माउली व तुकोबांच्या भेटीसाठी वाखरी पालखी तळावर आल्या होत्या. सर्व संतांच्या मेळ्यातील वारकरी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत होते. भेटीगाठीचा आनंद वाखरी तळावर दिसत होता. सर्व संतांच्या पालख्यांचे एकाच वेळी दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने, वाखरी पालखी तळावर पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. या वेळी भाविक व वारकरी एकत्र आल्याने तब्बल १० लाखांपेक्षा अधिक गर्दी या ठिकाणी होती. पंढरपूर-वाखरी मार्गावर गर्दीबुधवारी सर्व संतांच्या पालख्या वाखरीत दाखल झाल्यानंतर, पंढरपूर शहर व पंढरपुरात दाखल झालेल्या पालख्यांनी त्या पालख्यांच्या दर्शनासाठी वाखरीकडे प्रस्थान केले. यामुळे वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गावर मोठी गर्दी झाली.
संतांचा दळभार वाखरीत
By admin | Updated: July 14, 2016 04:02 IST