पुणो : आज हजारो लोक संशोधन करीत असल्याने ‘उदंड झाले संशोधक’ असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हे संशोधक अचानक कसे निर्माण होतात? असा सवाल करीत संत साहित्याचे भाष्यकार आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. यु. म. पठाण यांनी हा संशोधनाचा :हास थांबविला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी विभागप्रमुख आणि संत साहित्याचे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. अशोक कामत यांच्या ‘संत नामदेव-जीवनकार्य आणि मराठी-हिंदी काव्य’ या द्विखंडात्मक ग्रंथाचा लोकार्पण सोहळा डॉ. पठाण यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, संत नामदेव महाराजांचे वंशज ह. भ. प. कृष्णदासबुवा नामदेवबुवा नामदास, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. श्यामा घोणसे उपस्थित होते. डॉ. पठाण म्हणाले, की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदोन्नतीसाठी पीएच.डी. अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ती मिळविण्यासाठी पीएच.डी. करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांचे गाईडही बोगस आहेत. पीएच.डी.साठी जे हजार लोक अर्ज करतात त्यांचा कल नक्की कुठे आहे, हे तपासून पाहण्याची जी कमिटी आहे त्यांची योग्यता काय? हादेखील प्रश्न आहे. विद्यापीठामध्ये अध्यासनं सुरू केली जातात, मात्र या अध्यासनांना नेमकी कार्यप्रणालीच नसल्याने संशोधन व नेमके काय काम चालले आहे ते कळत नाही. त्यामुळे ती बंद केली जातात किंवा नावाला सुरू राहतात. त्यामुळे अध्यासनं नक्की कोणत्या प्रकारचे कार्य करतात, याचे मूल्यमापन झाले पाहिजे.’’ सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी, तर डॉ. मंगेश कश्यप यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मराठीचे काय होईल याविषयी नेहमी चिंता व्यक्त केली जाते; मात्र संत साहित्य जोर्पयत आहे तोर्पयत मराठीला मरण नाही. वर्षातून एकदा साहित्य संमेलन घेतले जाते. तेव्हा मराठी भाषाप्रेमी साहित्याकडे वळतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
- डॉ. गो. बं. देगलूरकर