मुंबई : मुंबई महापालिकेतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर राज्यातील महापालिका आणि नागरी भागात खोदकाम आणि केबलिंगसाठी नवीन धोरण बनविण्यात येणार असून, तोपर्यंत रिलायन्स कंपनीच्या केबलिंगचे काम स्थगित करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका हद्दीत रिलायन्स कंपनीने परवानगीशिवायच केबलिंगसाठी केलेल्या खोदकाम, इमारतीवरील टॉवरबाबतची लक्षवेधी सूचना दीपक साळुंखे-पाटील यांनी विधान परिषदेत मांडली. रिलायन्सने केबलिंगसाठी विविध महापालिका क्षेत्रांत केबलिंगसाठी रस्ते खणले आहेत. त्यामुळे रस्त्यांची नासधूस झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. यावर बोलताना राज्यमंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील विविध महापालिका क्षेत्रातून रिलायन्सविरोधात तक्रारी येत आहेत. केबल टाकण्यासाठी रिलायन्सकडून रस्ते खोदण्यात येतात आणि त्यानंतर वरवर डागडुजी केली जाते. याबाबत नगरविकास खात्याने आजच नवीन धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर हे धोरण असणार आहे. ग्रामीण भागासाठी यापूर्वीच धोरण ठरविण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले. माहिती - दळवळणाच्या आवश्यकता लक्षात घेत आयटी-शासन निर्णयाद्वारे अशा कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती, असेही सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)
रिलायन्सच्या केबलिंगवर बंदी
By admin | Updated: June 15, 2014 02:37 IST