पुणे: बोपखेल येथील हिदायतुल मदरशाची तोडफोड करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. राज मुकेश छजलानी (वय २२), किरण रमेश निकम (वय १९), कमलेश राजेंद्र घुले (वय २५), रोहित विजय जगदाळे (वय २०), ओमकार विठ्ठल घुले (वय २२), निलेश विठ्ठल घुले (वय २४), सनी दत्तू शेलार (वय २०) आणि समीर सखाराम झपके (वय २३, सर्वजण रा. बोपखेल) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजीज मोहंमदसाहिब काझी (वय ६०, रा. बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. फेसबुकवर महापुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याच्या रागातून आरोपींनी बोपखेल येथील हिदायतुल मदरशाची शनिवारी रात्री पावणेबारा वाजता तोडफोड केली होती. तसेच बाहेरील रिक्षा आणि दुचाकी गाड्यांचीही तोडफोड करून नुकसान केले होते. यातील अन्य आरोपींचा तपास करण्यासाठी आणि गुन्हा करताना त्यांनी वापरलेले लाकडी दांडके हस्तगत करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची सरकारी वकील वामन कोळी यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ८ जणांना पोलिस कोठडी
By admin | Updated: June 2, 2014 22:38 IST