तेजस वाघमारे, मुंबईमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जानेवारी २0१४मध्ये झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (सिव्हिल) सेवा परीक्षा ग्रुप ए या मुख्य परीक्षेचा निकाल आणि ग्रुप बी परीक्षेचा मुलाखत कार्यक्रम रखडलेला आहे. परीक्षा होऊन एक वर्ष लोटले तरी निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांध्ये तीव्र नाराजी आहे.एमपीएससीने महाराष्ट्र अभियांत्रिकी (सिव्हिल) सेवा परीक्षेची जाहिरात २0१३ मध्ये दिली होती. पूर्व परीक्षा आॅक्टोबर २0१३ मध्ये तर १२ जानेवारी २०१४ रोजी मुख्य परीक्षा झाली. परंतु अद्यापपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. मुख्य परीक्षेला वर्ष लोटले तरी निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थी एमपीएससीच्या कार्यालयात संपर्क साधत आहेत. परंतु त्यांना कार्यालयातून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.या परीक्षेसह एमपीएससीने महाराष्ट्र अभियांत्रिकी (यंत्र) सेवा ग्रुप बी परीक्षा २0१४ मध्ये घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अद्यापपर्यंत या परीक्षेचा मुलाखत कार्यक्रम जाहीर झालेला नाही. परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखत कार्यक्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. या परीक्षांसह महाराष्ट्र वन सेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा एप्रिल २0१४मध्ये होऊनही मुख्य परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. शासनाकडून एमपीएससीच्या जागांबाबत घेण्यात येणारे निर्णय आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे परीक्षांचा कार्यक्रम लांबणीवर जातो. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाबाबत निश्चित दिनांक लगेच सांगता येणार नसल्याचे, एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन. मोरे यांनी सांगितले.
अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित
By admin | Updated: February 10, 2015 02:43 IST