मुंबई : सुमारे ७५८ कोटी रूपयांच्या घोटाळ्याने चर्चेत आलेली पेण अर्बन बँक दिवाळखोर म्हणून घोषित करण्याच्या सहकार आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली व सुनावणी १६ जूनपर्यंत तहकूब केली़ यामुळे दिवाळखोरीची प्रक्रिया तूर्तास करता येणार नसल्याने बँकेच्या १ लाख ९५ हजार ७७५ ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे़ काही दिवसांपूर्वीच सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी या बँकेसंदर्भातील हा निर्णय जाहीर केला़ याविरोधात पेण अर्बन बँक संघर्ष समितीने न्यायालयात धाव घेतली़ सुट्टीकालीन न्या़ रमेश धानुका व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ या घोटाळ्याविषयी न्यायालयात याचिका प्रलंबित आहे़ तसेच या प्रकरणाचा तपासही सुरू आहे़ तसेच ही बँक दिवाळखोरीत न काढता तिला पुनर्जीवित करता येऊ शकते का, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत़ असे असताना ही बँक दिवाळखोरीत कशी काढली जाऊ शकते, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने ही बँक दिवाळखोर घोषित करण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली़ या बँकेची स्थापना १९३५ मध्ये झाली असून तिच्या १८ शाखा आहेत़ त्यातील तीन शाखा मुंबईतही आहेत़ बोगस नावाने खाते उघडून कर्ज वाटप केल्याने या बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला़ याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष शिषीर धारकर यांनाही अटक झाली़ या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यासाठी तेथील ठेवीदारांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे़
पेण अर्बनची सुनावणी तहकूब
By admin | Updated: May 20, 2014 03:24 IST