मनोहर कुंभेजकर, मुंबईभारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मालदिव या राष्ट्रांमधील मच्छीमार आजही दारिद्र्यरेषेखाली हलाखीचे जीवन जगत आहेत. या राष्ट्रांमधील मच्छीमारांची एकमेकांच्या हद्दीत गेल्यानंतर पिळवणूक होते, हे रोखण्यासाठी सार्कसारख्या संघटनेची निर्मिती करावी, अशी मागणी भारतीय मच्छीमार संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे श्रीलंका उच्चायुक्तांनी या मागणीला संमतीदेखील दिली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंके अशा सागरी देशांतील मच्छीमारांचा वाद हा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. सागरी सीमा दृष्टिपथात नसल्यामुळे मच्छीमार अनेकदा चुकून दुसऱ्या देशांच्या सीमेत प्रवेश करतात. त्यांना पकडून आरोपी बनवून अतिरेकी म्हणून आरोप करून शिक्षा ठोठावून कारागृहांमध्ये डांबले जाते. त्यामुळे अशा मच्छीमारांवरील आरोपांसंदर्भात खरेखोटेपणा पाहण्यास मच्छीमारांचा सहभाग असलेली सार्कसारखी संघटना उभारणे गरजेचे असल्याचे भारतीय मच्छीमार संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भात नॅशनल असोसिएशन आॅफ फिशरमन या मच्छीमार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी व प्रदेशाध्यक्ष राजहंस टपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मागणी केली.
सागरी देशांत हवी सार्कसारखी संघटना
By admin | Updated: December 23, 2014 02:49 IST