नागपूर: विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय केव्हा होणार असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत घोषणा दिल्या. त्यामुळे दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाजाच्या दुसऱ्या सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेला सुरुवात होत असतानाच राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. दुष्काळ, गारपीट यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होत असताना सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. राष्ट्रकूल संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटन समारंभात दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. संसदीय परंपरेला साजेसा हा प्रकार नाही, असे टकले म्हणाले. शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरी विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा होईल, अशी अपक्षा होती. याबाबत विधिमंडळ सचिवांनी सभापतींना काय मार्गदर्शन केले याची माहिती सभागृहाला द्यावी. आतापर्यंत असा प्रकार कधीच घडला नाही. यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करणार, असे सभापतींनी यापूर्वीच स्पष्ट केल्याने आता यावर चर्चा नाही, असा निर्णय तालिका सभापती रामनाथ मोते यांनी दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य संतापले व त्यांनी सभापतींच्या आसनापुढे येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेतेपदावरून परिषदेत पुन्हा गदारोळ
By admin | Updated: December 16, 2014 02:28 IST