परिवहन विभागाचे आदेश : मुदत संपायला आलेल्या लर्निंग लायसन्सधारकांना दिलासा नागपूर : पक्क्या वाहन परवान्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजनेचा बोजवारा उडला आहे. एकट्या आरटीओ, शहर कार्यालयात वाहन चाचणी परीक्षेच्या अपॉर्इंटमेंट घेण्यासाठी तब्बल दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा फटका मुदत संपायला आलेल्या अनेक शिकाऊ परवानाधारकांना (लर्निंग लायसन्स) बसत आहे. यासंदर्भातील ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट फेल’ या मथळ्याखाली लोकमतने ६ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल परिवहन विभागाने घेतली असून, शिकाऊ परवान्याची (लर्निंग लायसन्स) मुदत संपायला आलेल्यांना आॅनलाईन अपॉर्इंटमेंटसाठी गरज नसल्याचे निर्देश दिले आहेत.आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची प्रचंड गर्दी, तासन्तास रांगेत उभे राहण्याची येत असलेली पाळी, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्याची कारणे देत परिवहन विभागाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंट योजना सुरू केली. १ डिसेंबरपासून पक्क्या परवान्यासाठी याची सक्ती केली. सुरुवातीला या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परंतु काहीच दिवसांत अपॉर्इंटमेंटसाठी दीड महिन्यांची प्रतीक्षा करण्याची पाळी आली. याचा फटका ज्यांची लर्निंग लायसन्सची सहा महिन्यांची मुदत संपायला आली त्यांना आणि जे चाचणी परीक्षेत नापास झाले त्यांना बसत होता. अनेकांवर तर पुन्हा शिकाऊ परवान्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली. या विषयाला घेऊन ‘लोकमत’ने वाचा फोडली. यात परिवहन उपायुक्त (संगणक) पी. महाजन यांनी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते. अखेर सोमवारी यासंदर्भातील परिवहन विभागाचे आदेश धडकले. यात ज्या उमेदवारांनी जुलै २०१४ व आॅगस्ट २०१४ या महिन्यात आॅनलाईन अपॉर्इंटमेंटपूर्वी शिकाऊ परवाना प्राप्त केला आहे किंवा ज्यांच्या परवान्याची मुदत जानेवारी व फेब्रुवारी २०१५ या महिन्यात संपत आहे, परंतु पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंट मिळत नाही, अशा उमेदवारांसाठी विना अपॉर्इंटमेंट वाहन चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची अट रद्द!
By admin | Updated: January 13, 2015 01:07 IST