चिपळूण : शाळा शिकण्याच्या वयातच काही मुलांना भीक मागण्याची वेळ येत आहे. शहरातील काही गरीब लोक भीक मागण्यासाठी आपल्या घरातील मुलांचा वापर करत असल्याचे दिसून येत असून काही मुले दिवसभर भीक मागत असल्याचे दिसून येते. राज्य व केंद्र सरकार विविध पातळीवर लहान मुलांचे जीवनमान उंचवावे यासाठी शालेय जीवनापासून विविध उपक्रम राबवित आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होवू शकतो. परंतु, आजही आपल्या गावामध्ये शिकण्याच्या वयात भीक मागण्याची वेळ काही मुलांवर येत आहे. देवाचा फोटो हातात घेवून बाजारपेठेत फिरणारी अनेक मुले दिसत आहेत. त्यामध्ये १० ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. यामध्ये मुलीही असल्याचे चित्र आहे. बहादूरशेख नाका येथील झोपडपट्टीत राहणारी लक्ष्मी ही अंदाजे १० ते १२ वर्षाची असून लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याचे ती सांगते तर तिच्या बरोबर भीक मागणारी काशी ही १२ ते १४ वर्षाची असून जन्मत:च ती मुकी आहे. बाजारपेठेत भीक मागून आईला हातभार आम्ही लावत असल्याचे लक्ष्मी पोटतिडकीने सांगते. आमचे मूळ गाव कोल्हापूर येथील असून सध्या गेली काही वर्ष माझी आई व अन्य ४ भावंडांसह बहादूरशेख नाका येथील झोपडपट्टीत राहतो. आई ही कोथिंबिर विक्रीचा व्यवसाय करीत असून तिला हातभार लागावा, या उद्देशाने आम्ही दोघी बहिणी व भावंडेही भीक मागून मिळेल ती मदत तिला करीत आहोत, असे लक्ष्मीने सांगितले. काही वेळा दानशूर व्यक्ती आम्हांला आर्थिक मदत करतात. सर्वांकडेच ही भावना नसते. काही वेळा ही भीकही कोणी देण्यास तयार नसतात. आमची हेळसांड केली जाते अशी खंतही लक्ष्मीने यावेळी व्यक्त केली. दिवसभर फिरूनही पदरात काहीच पडलं नाही, तर घरी परतताना खूप वाईट वाटतं, दिवस फुकट गेल्याचे जास्त वाईट वाटतं, असे लक्ष्मीने सांगितले. पण जे पैसे मिळतात, त्याने आईच्या व्यवसायाला हातभार लागतो, असेही तिनेसांगितले. राज्य व केंद्र शासन लहान मुलांसाठी विविध योजना व उपक्रम राबवित आहे. लहान मुलांचे जीवनमान सुधारले पाहिजे यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. अच्छे दिन आयेंगे म्हणणारे सरकार या भीक मागणाऱ्या व अनाथ मुलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केव्हा प्रयत्न करणार? असा सवाल केला जात आहे. (वार्ताहर)ऐका लक्ष्मीची कहाणी..बहादूरशेख नाका येथील १० ते १२ वर्षांची लक्ष्मी ही वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईला हातभार म्हणून भीक मागते. संपूर्ण बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या पैशातून ती आईला मदत करते.चिपळूण झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे जीवनमान कधी सुधारणार? शाळा शिकण्याच्या वयातच लक्ष्मी, काशीवर भीक मागण्याची वेळलहानपणीच वडीलांचे छत्र हरपल्याचे लक्ष्मी सांगते तर मोठी बहिण काशी ही जन्मत:च मुकी आहे.
बालपण नको, पण जीवन आवर....ऐका लक्ष्मीची कहाणी..
By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST