ठाणे : आधी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर ती मागे घेण्यावरून रिपाइं एकतावादीचे कळवा विभाग कार्याध्यक्ष भास्कर कदम यांची मंगळवारी पहाटे २ वा. सुमारास हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने घोलाईनगर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.कदम यांनी शंकर शिंदे याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. याच तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस त्याचा शोध घेत घोलाईनगरात पोहचले. त्यांना पाहून शंकर पसार झाला. मात्र पोलीस गेल्यानंतर त्याने पुन्हा कदम यांना गाठून त्यांच्यावर पहाटे आपल्या साथीदारांच्या मदतीने चॉपरने हल्ला केला. त्यावेळी कदम यांना वाचिवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश सोनावणे, अतुल भंडारे, किरण साठे आणि भास्कर यांची पत्नी सायली हे चौघेजण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेले भास्कर यांचा मात्र जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमींवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. भगवान कांबळे (५५ रा. घोलाईनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला २० डिसेंबर २०१४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अन्य चौघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांनी दिली. शंकर याच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यातही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर कळवा आणि घोलाईनगर परिसरातील दुकाने मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
रिपाइं एकतावादीच्या कार्यकर्त्याचा खून
By admin | Updated: December 17, 2014 03:11 IST