मुंबई : नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरचे लैंगिक शोषण तसेच एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येस येथील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे कारणीभूत आहेत. चौकशी अहवालातही व्यवहारे दोषी आढळून आले आहेत. मात्र, व्यवहारे हे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेहुणे असल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे वित्तमंत्री मुनगंटीवार आणि त्यांना सहकार्य करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी कॉँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार आणि तावडेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एका महिला डॉक्टरने व्यवहारे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले; तर एका विद्यार्थ्याने त्यांच्या मानसिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, व्यवहारे यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी वित्त मंत्र्यांच्या कार्यालयातून प्रचंड दबाव टाकण्यात आला. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. नातेवाईक व हितसंबंध जपून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही मंत्र्यांना दोषी ठरविल्याचे, सावंत यांनी सांगितले.
मुनगंटीवार, तावडेंची हकालपट्टी करा - काँग्रेस
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST