- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समद्धी जीवन कंपनीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार याची महाराष्ट्रासह चार राज्यांतील २०७ कोटींची मालमत्ता सोमवारी जप्त केली. हेलिकॉप्टर, पुण्यातील तीन हॉटेल्स, कार्यालये व भूखंडाचा त्यामध्ये समावेश आहे.सांताक्रुझ विमानतळावरून मोतेवारच्या मालकीचे हेलिकॉप्टर जप्त केले आहे. त्याचप्रमाणे पुण्यासह मध्य प्रदेश, दिल्ली येथील मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जप्तीची कारवाई सुरू होती. गैरव्यवहाराप्रकरणी मोतेवार याच्याशी संबंधित एका प्रसिद्ध सिने अभिनेत्याकडेही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ग्रामीण व निमशहरी भागातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रक्कम हडप केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी संचालक महेश मोतेवार व त्याची पत्नी लीना गेल्या वर्षभरापासून सीबीआयच्या ताब्यात आहेत. मोतेवार याने समृद्धी जीवन योजनेंतर्गत हजारो नागरिकांकडून कोट्यवधींची रक्कम जमा केली होती. पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या योजनेला भुलून देशभरातील सहा लाख ४८ हजारांहून अधिक नागरिकांनी गुंतवणूक केली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही त्यांची रक्कम परत न केल्याने २०१४मध्ये पहिल्यांदा महेश मोतेवार याच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आला. मोतेवार याने ‘लाइव्ह इंडिया’ व ‘मी मराठी’ वृत्तवाहिनी तसेच वृत्तपत्र सुरू केले होते. मात्र ते बंद पडले. येथील कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने त्यांनी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मोतेवारची २०७ कोटींची संपत्ती जप्त
By admin | Updated: June 13, 2017 01:33 IST