वाशिम: दूषित पाणीपुरवठय़ामुळे निर्माण होणार्या विविध गंभीर स्वरुपाच्या आजारांना आळा घालण्याकरिता राज्यशासनाच्यावतीने १ डिसेंबर ते ३१ मे दरम्यान पेयजलस्त्रोतांच्या रासायनिक तपासणीची मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या पेयजलांच्या नमुन्यांपैकी निम्मेपेक्षा अधिक नमुने दूषित असल्याचे आढळून आले असल्याचे खळबळजनक वास्तव या तपासणीच्या आकडेवारीने उघड केले आहे.कावीळ, विषमज्वर, कॉलरा, अतिसार, दंतरोग, कर्करोग, यकृत आतड्याचे, त्वचेचे रोग, हाडांचे, फुफ्फुसाचे, किडनीचे व मज्जासंस्थेचे आजार दूषित पाणी पिण्यामुळे होत असतात.विहिरी व विंधन विहिरीचेच नाही तर काही ठिकाणी नळयोजनेद्वारे पुरवण्यात येणारे पाणीदेखील रासायनिक घटकयुक्त व विषारी असते. या पाण्यात फ्लोराईड, क्लोराईड, नायट्रेट, लोह, तांबे, मॅगनीज, सल्फेट, कॅॅल्शियम, सेलेनियम, आर्सेनिक, शिसे, सायनाईड, जस्त, क्रोमियम, पॉलीन्युक्लीयर, अँरोमॅटीक, हायड्रोकार्बन, अल्युमिनियम व कीटकनाशकांचा अंश आदी विषारी व रासायनिक घटक विरघळलेल्या स्वरुपात असतात.यापैकी फ्लोराईडचे प्रमाण एका लिटरमागे १.५ मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास तशा पाण्याच्या दीर्घकाळ सेवनाने दात किडतात, दातांवर डाग पडतात. दातांवर व इतर अवयवांवर दुरगामी दुष्परिणाम होतात. नायट्रेटमुळे नवजात बाळाला हिमोग्लोबीनिया,ब्ल्यू बेबी सिंड्रोम हे रोग होऊ शकतात. दूषित पाण्यामुळे अतिसार विषमज्वर, काविळ, कॉलरा आदी रोग होऊ शकतात.पाण्यात द्राव्य घनपदार्थाचे प्रमाण ५00 मिली ग्रॅमपेक्षा जास्त असल्यास पाणी पचत नाही व आतड्याचे विकार उद्भवतात. सल्फेटचे प्रमाण २00 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास आतड्यांवर विपरीत परिणाम होतात. फ्लोरॉईडचे प्रमाण लीटरमागे १ मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास ल्युरॉसीस हा आजार होतो. क्रोमीयम व पॉलीन्युकलेअर अँरामॅटीक, हायड्रोकॉर्बनमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.या रासायनिक घटक पदार्थाचे पेयजल स्त्रोतामध्ये असणारे प्रमाण घातक पातळीएवढे आहे काय, हे तपासण्यासाठी जिल्हय़ात १ डिसेंबर ते ३१ मेपर्यंत पेयजल स्त्रोतांमधील पाणी नमुन्यांच्या तपासणी मोहीम राबविण्यात आली.तसे जिल्ह्यात एकूण ४४५७ जलस्त्रोत आहेत. त्यात वाशिम तालुक्यात ५७२, मालेगाव-८६७, रिसोड-६५६, मंगरुळपीर-८६९, कारंजा-९३६ व मानोरा तालुक्यात ५८७ पाणीस्त्रोत आहेत. त्यापैकी पेयजल स्त्रोतांची संख्या २,९६३ एवढी आहे. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील ४४६, मालेगाव-५२२, रिसोड-३५३, मंगरूळपीर- ४२६, कारंजा-६४८ तर मानोरा तालुक्यातील ५६८ पेयजलस्त्रोतांचा समावेश आहे. जिल्हाभरातील एकूण २,९६३ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी वाशिममधील जलपरिक्षण प्रयोगशाळेत करण्यात येणार होती.या पेयजल स्त्रोतांमधील पाण्याचे नमुने ४९३ गावांमधील जलसुरक्षक घेऊन आरोग्य सेवकांच्या मदतीने जलपरिक्षण प्रयोगशाळेत पाठविणार होते; परंतु जलसुरक्षकांकडून यापैकी १,४५७ पेयजलस्त्रोतांमधील पाणीनमुनेच जलपरीक्षण प्रयोगशाळेला निर्धारित मुदतीत देण्यात आले.त्यापैकी १0९६ पाणीनमुने वाशिमच्या जलपरीक्षण प्रयोगशाळेकडून तपासून जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले. त्यापैकी तब्बल ५६९ पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. या ५६९ पाणी नमुन्यांपैकी ४६८ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण किमान पातळीपेक्षा जास्त आढळून आले आहे. १२२ पाणी नमुन्यांमध्ये लोह धातूचे प्रमाण जास्त आढळले. ३६ पाणी नमुन्यात पाणी जास्त जड असल्याचे निदर्शनास आले. १९ पाणी नमुन्यात क्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. १२ पाणी नमुन्यांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ८ पाणी नमुन्यात पाण्याचा गढूळपणा जास्त असल्याचे आढळले आहे. ५ पाणी नमुन्यात पीएचचे प्रमाण जास्त असल्याचे, दोन पाणी नमुन्यात अल्कलीचे प्रमाण अधिक असल्याचे तर एका पाणी नमुन्यात टीडीएसचे प्रमाण अधिक असल्याने ते पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. आता जिल्ह्यातील तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांच्या प्रकरणी राज्य शासनाने सदर दूषित पाणी स्त्रोतांमधील पाणी लोकांनी पिऊ नये, यासाठी जनजागृती करण्यासोबतच लोकांना नवे शुद्ध पाणीस्त्रोत उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरणार आहे; तसेच पेयजलस्त्रोतांच्या तपासणी मोहिमेत पाणीनमुने घेण्याचे राहून गेलेल्या उर्वरित पाणी स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन ते तपासून घेणे महत्त्वाचे गरजेचे आहे.
तपासणीत निम्म्यांपेक्षा जास्त पेयजल नमुने दूषित
By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST