मोहन मस्कर-पाटील -- सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात जवळपास ेदोनशेहून अधिक नामांकित पैलवान कुस्त्यांचा ‘फड’ सोडून आपल्या नेत्यांच्या संरक्षणार्थ आणि प्रचारार्थ ‘राजकीय फडात’ उतरले आहेत. विशेष म्हणजे नामांकित आणि इतर लहान-मोठ्या पैलवानांची संख्या धरली तर ती पाचशेच्या पुढे जाते. यासाठी राजकीय नेत्यांनी चांगली किमंत मोजल्याचे सांगण्यात येते. प्रचार सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत त्यांना जे हवे ते क्षणात देण्याची सोय संबंधित उमेदवारांनी केली आहे. विधानसभा निवडणूक काळात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना अनेकदा विरोधकांकडून गावांत अटकाव केला जातो. काहीदा सभा उधळण्याचा प्रयत्न करतात. अशी परिस्थिती उदभवली तर त्यापासून बचाव करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी आपल्याबरोबर पैलवानांना घेतात. त्यांच्यासाठी खास गाड्यांचीही सोय केलेली असते. अनेकदा तर उमेदवार गावांत येण्यापूर्वी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पैलवानांची गाडी पुढे पाठवून दिली जाते. गावात एकप्रकारे विरोधकांची कोणतीही हालचाल होऊ नये म्हणून त्यावर दबाव टाकण्याचा हा एक प्रयत्न असतो. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेत्यांनी ‘कृष्णाकाठ’च्या पैलवानांना पायघड्या अंथरल्या आहेत. परिणामी विधानसभेला त्यांचा भाव चांगलाच वधारला असून दिवाळी आधीच त्यांची दिवाळी आहे. स्थानिक मल्ल राजकीय फडात उतरल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालमी ओस पडल्या आहेत. तीच परिस्थिती वाई आणि फलटण येथील अनेक तालमीत आहे. जिल्ह्यातील अनेक पैलवान आणि तालमी राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. काही नेते तर संबंधित पैलवानांना खुराक पुरवितात. त्यामध्ये कारखाने आघाडीवर असतात. त्यामुळे कारखान्यांशी संबंधित असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पैलवानांची टीम मतदारसंघात नेहमीच कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी खास करून ‘स्कॉर्पिओ’, ‘इनोव्हा’ची सोय आहे. ‘कऱ्हाड उत्तर’मध्ये कोल्हापूर तर ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये कोल्हापूर आणि सांगलीचे पैलवान तळ ठोकून आहेत. ‘माण’मध्येही सांगलीच्या पैलवानांना मागणी आहे. येथे काही पैलवान पुण्याहूनही आले आहेत, फरक इतकाच की येथे त्यांना ‘बॉडीगार्ड’ म्हणतात. कोल्हापूर अथवा सांगलीत प्रशिक्षण घेणारे पैलवान हे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते येथे येताना आपल्या काही मित्रांनाही बरोबर घेऊन आले आहेत. पैलवानांचे दिवसाचे भाडे एक पैलवान : २,000 रुपये, एक गाडी : २0,000, संपूर्ण निवडणूक : २,00,000 रुपये. (हे दर काही पैलवानांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिले आहेत. त्याचे कोठेही रेकॉर्ड नाही) पुण्याचे बॉडीगार्ड अन् सांगलीचे पैलवान प्रत्येक निवडणुकीत सांगलीकर पैलवानांना नेहमीच निमंत्रण असते. सातारा जिल्ह्यात सांगलीच्या पैलवानांना सर्वाधिक मागणी आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर आहे. सांगलीत जवळपास वीस ते पंचवीस तालमी असून त्या अनेक राजकीय नेत्यांच्या आश्रयाखालील आहेत. येथील दोन तालमी फक्त ‘भांडण-मारामारी’ यासाठीच प्रसिध्द आहेत. सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कोणतीही निवडणूक लागली की येथील पैलवांनाना निंमत्रण दिले जाते. पैलवानही अगदी आनंदाने हे निमंत्रण स्वीकारतात. लोकसभा, विधानसभा, साखर कारखाना, ग्रामंपचायत यापैकी कोणतीही निवडणूूक सांगलीकर पैलवानांना वर्ज्य नाही. माण-खटाव मतदारसंघात मोठा राजकीय फड रंगला आहे. येथे मोठी चुरस असल्यामुळे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. येथे आमदारकीसाठी नशीब आजमावणाऱ्या एका उमेदवाराने पुण्याहून ‘बॉडीगार्ड’ची फौज आणली आहेत. या उमेदवाराच्या गाडीच्या मागे एक आणि पुढे एक अशी गाडी असते. दुसऱ्या एका उमेदवाराने सांगलीहून पैलवान आणले आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीत पैलवान नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीत अत्यावश्यक असलेल्या प्रत्येक बाबींसाठी दर निश्चित केले आहेत. प्रचारसभा, जेवणावळी, सभा, मंडप याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, यातून उमेदवारांनी पैसे देऊन आणलेले आणि प्रत्यक्षात कार्यकर्ते म्हणून वावरणारे बॉडीगार्ड आणि मल्ल सुटले आहेत. पैलवान म्हणायचे कोणाला याचा निकष निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे निवडणूक आयोगालाही काहीएक करता येत नाही. अनेक नेत्यांची ‘लाल माती’शी जवळीक जिल्ह्यात अनेक नेत्यांची लाल मातीशी जवळीक आहे आणि त्यांनी ती विविध माध्यमातून जपली आहे. ‘वाई’तून नशीब आजमावणारे आणि ‘किसन वीर’चे अध्यक्ष असलेले मदन भोसले यांनी कुस्तीला चालना देण्यासाठी कुस्ती केंद्र स्थापन केले आहे. ‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांचे संपूर्ण कुटुंबच कुस्तीशी जोडले गेले आहे. त्यांचे वडील साहेबराव पवार कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. माणचे उमेदवार जयकुमार गोरे आणि त्यांचे भाऊ तसेच ‘रासप’कडून नशीब आजमावणारे शेखर गोरे यांचाही तालमीशी संबंध आहे. मंत्री शशिकांत शिंदे, रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांनीही कुस्तीप्रेम जोपासले आहे. ‘कऱ्हाड उत्तर’चे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे सासरे महाराष्ट्रातील पहिले ‘महाराष्ट्र केसरी’ आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडॅ. नितीन भोसले दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन करतात. पै. निलेश जाधव-पाटील हे ‘शशिकांतजी शिंदे प्रतिष्ठान’चे राज्य कार्याध्यक्ष तर पै. विक्रांत डोंगरे वाई तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानेही कुस्ती मैदानाचे आयोजन करतात.
उमेदवारांच्या संरक्षणार्थ सरसावले दोनशेहून अधिक मल्ल
By admin | Updated: October 10, 2014 23:01 IST