गजानन दिवाण - औरंगाबाद
देशातील बहुतांश भागात मान्सूनने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ शेती आणि शेतक:यांचे नुकसान झाले नाही, तर सारे निसर्गचक्रच बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊसच नसल्याने देशातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे जीवनचक्र बदलले असून अनेकांचा ‘पाळणा’ लांबला आहे.
पावसाळा म्हणजे निसर्गाचा भरभरून आनंद घेण्याचा काळ. याच काळात अनेक पक्षी सातासमुद्रापलीकडून भारतात येतात आणि येथेच घरटी बांधून आपला संसार फुलवितात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने त्यांचे सारे जीवनचक्रच बदलले आहे. द. आफ्रिका तसेच हिमालयातून आपल्याकडे येणारा चातक कोठेच दिसत नाही. त्याचा एखादाही ‘कॉल’ ऐकायला मिळत नाही, अशी माहिती वॉटरशेड ऑर्गनायेङोशन ट्रस्टचे व्यवस्थापक आणि पुण्यातील पक्षीतज्ज्ञ डॉ. गिरीश जठार यांनी ‘लोकमत’ला दिली. गेल्या दोन दिवसांपासून ते नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यांत फिरत आहेत. या काळात नेहमी पावसाळ्यात प्रजननासाठी येणारा, घरटी बांधणारा एकही पक्षी त्यांना दिसला नाही किंवा त्यांची कुठली इतर हालचालही दिसली नाही. शिंपी, वटवटय़ा, ठिपकेवाला मुनिया, सुगरण, सूर्यपक्षी, चष्मेवाला या सा:या पक्ष्यांच्या प्रजननाचा हाच काळ. मात्र यातला एकही पक्षी आपल्याला दिसला नसल्याचे जठार यांनी सांगितले. मुनियाला घरटी बांधण्यासाठी लांब पाती लागतात. पाऊस न पडल्याने या पाती कशा मिळणार? आता उशिरा पाऊस पडला तर या पक्ष्यांचा पाळणा उशिरा हालेलही; पण त्यांना मिळणा:या अन्नावर आणि पुढील जीवनचक्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे जठार म्हणाले.
आपल्याकडे सर्रास आढळणारा राष्ट्रीय पक्षी मोर याच काळात नाल्याच्या किनारी, टेकडीच्या उतारावर आपली घरटी बांधतो. पावसामुळे कीटकांची संख्या वाढते. त्यामुळे मोरांना, त्यांच्या पिलांना प्रजनन काळात अन्नाची कमतरता भासत नाही. मात्र, पाऊसच लांबल्याने सारेच चक्र थांबले आहे. अशीच स्थिती तितर या पक्ष्याची आहे. उत्तरेकडून येणा:या नवरंगलाही कमी पावसाचा फटका बसत आहे. तो साधारण मे महिन्यात येतो. जून-जुलैमध्ये पाणथळीच्या ठिकाणी घरटी बांधतो. निळ्या शेपटीचा वेडा राघू उत्तरेकडूनच येतो. अन्नाजवळ म्हणजे नद्यांच्या थडी-कपारीमध्ये तो आपले घर सजवितो. छोटे किडे-फुलपाखरे हे त्यांचे अन्न. जुलै महिन्यात तर तो परतीच्या प्रवासाला निघतो. मात्र, पाऊसच लांबल्याने किडय़ांच्या-फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाला. पोटभर खाऊन अंडी देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या या पक्ष्याचा आता पुढील प्रवास बदलेल. पाऊस उशिरा आल्यास कदाचित त्याला आपला मुक्काम वाढवावा लागेल, अशी माहिती अमरावती येथील पक्षीनिरीक्षक यादव तरटे यांनी ‘लोकमत’ला दिली. समूहाने घरटी करणारे मोठा बगळा, छोटा बगळा, पाणकावळा या पक्ष्यांच्या जीवनमानावरही विपरीत परिणाम जाणवत आहे.
पाणी भरपूर असेल तर भरपूर मासे निर्माण होतात. त्यामुळे त्यांना भरपूर अन्नही मिळते. पुढे पिलांच्या अन्नाचा प्रश्नही मिटतो. पावसाअभावी हे सारेच थांबले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक संजय करकरे यांनीही मान्सून लांबल्याचा पक्ष्यांना फटका कसा बसू शकतो याचे उदाहरण दिले. काही वर्षापूर्वी असाच पावसाळा लांबला होता. कोल्हापुरात तब्बल 23 दिवस पाऊसच नव्हता. सुगरण पक्ष्याने (नर) या काळात आपले घरटे अर्धवट अवस्थेत सोडले होते. अशी एक नव्हे अनेक घरटी होती, असे त्यांनी सांगितले.
सुगरणीचा संसार
घरटी बांधताना सुगरण हा पक्षी सर्वाधिक मेहनत घेतो, नर पक्षी घरटे बांधतो. या पक्ष्याचे डोके व छातीचा भाग पिवळा चमकदार असतो. पाऊस सुरू झाल्यावर त्याचे पंख दाट होऊ लागतात. पिलांना जन्म दिल्यानंतर मादीचे पंख गळू लागतात. ही घरटी भारतात सर्वत्र आढळतात. शेतातील पिके, किडे हे त्याचे आवडते अन्न. सुगरणीच्या झुंडीत मादींची संख्या अधिक असते. त्यामुळे एक नर दोन किंवा त्यापेक्षा अधिक मादींशी संसार करतो. मात्र पाऊसच न झाल्याने त्यांचे जीवनचक्र थांबले आहे.